पुणे : पुढारी वृत्तसेवा : गुजरातच्या वडनगरमधील प्रेरणा शाळेत विविध राज्य व केंद्रशासित प्रदेशातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तांत्रिक व व्यावहारिक हालचालींच्या माध्यमातून 'प्रेरणा द स्कूल ऑफ एक्सपेरिअन्शिअल लर्निंग' या कार्यक्रमांतर्गत बहुमूल्य असे मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. यामध्ये पहिल्या पाचमध्ये पुण्याने बाजी मारली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
'प्रेरणा द स्कूल ऑफ एक्सपेरिअन्शिअल लर्निंग' या कार्यक्रमांत इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय शिक्षण विभाग व शालेय शिक्षण व साक्षरता विभागातर्फे याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. गुजरातच्या वडनगरमधील प्रेरणा शाळेत दहा जिल्ह्यांतील 200 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यातील 100 मुले व 100 मुली यांच्यातील निवडक 200 विद्यार्थ्यांसाठी एक आठवडा निवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
नोंदणीकृत 100 मुले व 100 मुली यांच्यातील निवडक 200 विद्यार्थ्यांपैकी छाननी करून पुणे जिल्ह्यातून 10 मुले व दहा मुली निवडले जाणार आहेत. त्यातील एका मुलीला व एका मुलाला राज्य पातळीवर पाठवले जाणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 'प्रेरणा द स्कूल ऑफ एक्सपेरिअन्शिअल लर्निंग' या कार्यक्रमांसाठी 3 जानेवारीपासूनच विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू झाली आहे. त्यानुसार राज्यातील तब्बल 32 हजार 68 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये यवतमाळमधील 5 हजार 705 तर पुण्यातील 5 हजार 252 अशा सर्वाधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्याखालोखाल ठाणे (1106), नाशिक (1114), नागपूर (1379), अकोला (1762), मुंबई (2207), वाशिम (2692), लातूर (3061) आदी जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा