पुणे: शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर दरमहा पाच ते सात टक्का नफा देण्याचे आमिष दाखवून 69 लाख 80 हजार रुपयांची सहा जणांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Latest Pune News)
याप्रकरणी, कोंढवा पोलिसांनी जोहेब फरीद सय्यद (वय 33, रा. कौसरबाग कोंढवा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शाहरुख वाहीद भुरे (वय 32), मेहराज वाहीद भुरे (वय 35), वाहीत आस्मत भुरे, रुबीन शाहरुख भुरे (वय 30), झेबा वाहीत भुरे (वय 55, रा. सर्व ठाणे) यांच्या विरुद्ध महाराष्ट्र ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी 2023 ते मार्च 2025 दरम्यानच्या कालावधीत घडला आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादींना त्यांच्याकडे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणुकीवर दरमहा पाच ते सात टक्के नफा देण्याचे प्रलोभन दाखविले. फिर्यादी त्याला बळी पडले. त्यांनी आणि इतर पाच जणांनी मिळून आरोपींकडे एक कोटी 73 लाख 31 हजार रुपयांची गुंतवणूक केली.
फिर्यादी आणि इतर गुंतवणूकदारांनी आरोपींकडे पैशांचा तगादा लावल्यानंतर त्यांनी थोडे-थोडे करून एक कोटी तीन लाख पन्नास हजार रुपये परत दिले. त्यानंतर मात्र गुंतवणूकदारांचे राहिलेले 69 लाख 80 हजार रुपये परत न देता फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.