पुणे: विनापरवाना आणि बेकायदा मद्यविक्री करून सरकारचा महसूल बुडवणाऱ्या ढाब्यांवर उत्पादन शुल्क विभागाने विशेष पथकाच्या माध्यमातून धडक कारवाई केली. देहू-आळंदी रस्त्यावरील तळवडे परिसरातील पाच ढाब्यांवर छापे टाकून अवैध मद्यसाठा आणि मद्यपान करणाऱ्या 45 जणांवर गुन्हे दाखल केले. त्यामुळे अवैध मद्यविक्री करणाऱ्या हॉटेल, ढाबेचालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील अनेक भागांत रस्त्यालगत अनेक ढाब्यांमध्ये रात्रीच्या वेळेत विनापरवाना दारूविक्री, अवैध मद्यसाठा आणि मद्याची देवाणघेवाण आणि जागीच मद्यपानास प्रवृत्त करणाऱ्या गुप्त खोल्या अशा प्रकारचे उल्लंघन मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या निदर्शनास आले होते. यामुळे राज्याच्या महसुलाचे मोठे नुकसान होते. या सर्व पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने विशेष मोहीम राबवली.
पथकाने देहू-आळंदी रस्ता परिसरात लक्ष केंद्रित केले. तळवडे भागात संशयित हालचालींची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकत सलग पाच ढाब्यांची झडती घेतली. या कारवाईत हॉटेल समाट गार्डन, हॉटेल अभिरुची, हॉटेल जय मल्हार, हॉटेल शिवांजली आणि हॉटेल साई गार्डन या पाच ठिकाणी विनापरवाना मद्यविक्री सुरू असल्याचे आढळून आले. तसेच विनापरवाना मद्यसाठा, लपवून ठेवलेल्या मद्याच्या बाटल्या, मद्यपानासाठी बनवून देण्यात आलेला खासगी कक्ष आणि बिल नोंदी न ठेवण्याचे प्रकार उघडकीस आले. उत्पादन शुल्क विभागाने संबंधित ढाब्यांविरुद्ध कारवाई केली.
अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शैलेश शिंदे, संजय कोल्हे, दुय्यम निरीक्षक अभय औटे, तानाजी पाटील, बह्मानंद रेडेकर, अनिल सुतार, सहायक दुय्यम निरीक्षक सागर धुर्वे, जवान अमोल कांबळे, प्रमोद पालवे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.
अवैध हॉटेल, ढाब्यावर मद्यविक्री करणाऱ्याच्या विरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.अतुल कानडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पुणे