पुणे: गोवानिर्मित महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक व साठवणूक करणाऱ्या रॅकेटचा राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) विभागाच्या पथकाने पर्दाफाश केला. कॅम्प, भवानी पेठ भागात केलेल्या या कारवाईत उच्चप्रतिची स्कॉच, विविध बँडच्या बाटल्या, कारसह एकूण 8 लाख 699 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर, दोघांना अटक केली आहे.
राजेश भजनलाल बसंतानी (वय 52, रा. भवानी पेठ, पुणे), प्रकाश भजनलाल बसंतानी (रा. भवानी पेठ, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून विविध बॅंडच्या महागड्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनात पथक हद्दीत गस्तीवर होते.
त्यादरम्यान कॅम्पमधील बाबाजान चौक, कमानीजवळ संशयित वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये विविध विदेशी मद्याच्या सीलबंद बाटल्या आढळून आल्या. पथकाने येथून राजेश बसंतानी याला अटक करून 4 लाख 93 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर भवानी पेठ येथील राहत्या घरी छापा टाकला.
येथेही पथकाने विविध बँडच्या सीलबंद विदेशी मद्याच्या बाटल्या सापडल्या. या कारवाईत प्रकाश बसंतानी याला अटक करून 2 लाख 97 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्यात एकूण 32 बँडच्या विदेशी मद्याच्या बाटल्या तसेच चारचाकी वाहन असा एकूण 8 लाख 699 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे, उपअधीक्षक सुजित पाटील, संतोष जगदाळे यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक वसंत कौसडीकर, दुय्यम निरीक्षक रोहित माने, हितेश पवार, पूजा किरतकुडवे, जान्हवी शेडगे, श्रीधर टाकळकर यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.