Crime News Pudhari
पुणे

Pune Crime: पत्नीला ब्लेडचे तुकडे खाऊ घालून जीवे मारण्याचा प्रयत्न; पतीला सात वर्षे सक्तमजुरी

कॅल्शिअमच्या गोळ्या असल्याचे भासवून कॅप्सूलमधून दिले ब्लेडचे तुकडे; वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे न्यायालयाचा निकाल

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला कॅल्शिअमच्या गोळ्या असल्याचे भासवत कॅप्सूलमधून ब्लेडचे तुकडे खाऊ घालून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी आणि ७० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सोमनाथ साधू सपकाळ (वय ४५, रा. शिवणे, पुणे) असे त्याचे नाव आहे. विशेष म्हणजे, पीडित पत्नीने न्यायालयात पतीविरोधातील आरोप नाकारले.

मात्र, वैद्यकीय पुरावे आणि इतर साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांच्या न्यायालयाने पतीला दोषी ठरविले. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात नोव्हेंबर २०२३ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. ऑक्टोबर २०२३ मध्ये पत्नीच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. दोन वेळा शौचावाटे ब्लेडचे तुकडे बाहेर पडले.

त्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी त्रास वाढल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीत पोटात ब्लेडचा तुकडा आढळून आला. डॉक्टरांनी ११ नोव्हेंबर रोजी तो बाहेर काढला. या प्रकरणात, पोलिसांनी आरोपीला अटक करत न्यायालयात हजर केले. सरकार पक्षातर्फे सरकार वकील पाठक यांनी काम पाहिले. त्यांनी, सात साक्षीदार तपासले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान पत्नीने पतीविरोधातील आरोप नाकारले.

तसेच, त्यांच्यातील वाद मिटल्याचे सांगितले. मुलानेही वडिलांविरोधात साक्ष दिली नाही. मात्र, हा तुकडा प्राणघातक असून, त्यामुळे महिलेचा मृत्यू होऊ शकला असता, अशी साक्ष डॉक्टरांनी दिली. तसेच, डॉक्टरांची साक्ष आणि तपासादरम्यान मिळालेले इतर पुरावे आरोपीविरोधातील गुन्हा सिद्ध करण्यास पुरेसे आहेत.

आरोपीने पत्नीवर दबाव आणल्यामुळे तिने न्यायालयात आपली साक्ष बदलली असण्याची शक्यता आहे. केवळ साक्षीदार फितूर झाला म्हणून त्याची संपूर्ण साक्ष नाकारता येत नाही. त्यामुळे उपलब्ध पुराव्यांचा विचार करून आरोपीला दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद ॲड. पाठक यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT