पुणे: अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीच्या डोक्यात वार करून तिचा खून करणार्या पती मधुकर रामचंद्र पाटील (वय 52) यास न्यायालयाने जन्मठेपेसह तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांनी हा निकाल दिला.
ही घटना 2019 मध्ये घडली. याबाबत पाटील राहत असलेल्या घरमालकाने फिर्याद दिली आहे. घटनेच्या दिवशी पाटील यांच्या खोलीतून भांडण सुरू असल्याचा आवाज येत असल्याचा फोन फिर्यादींना आला. खोलीकडे जात असताना रस्त्यावर मधुकरची पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली आणि तो तिच्या शेजारी मांडी घालून बसला होता. (Latest Pune News)
’हे मीच निस्तरणार आहे, कुठेही पळून जाणार नाही,’ असे तो म्हणत होता. त्याच्या पत्नीला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलावली. मात्र, रुग्णालयात नेल्यावर उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला. आरोपी मधुकर याला ‘असे का केले?’ विचारले असता त्याला पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आला. ती अरेरावीची भाषा करू लागल्याने तिला कोयत्याने मारल्याचे त्याने सांगितले. या प्रकरणात मधुकरला अटक करीत त्याच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील जावेद खान यांनी कामकाज पाहिले.
‘दुर्गा’ श्वानाने ओळख परेडमधून शोधला होता आरोपी
तपासादरम्यान ओळख परेडच्या वेळी आरोपीसह आजूबाजूच्या लोकांना उभे केले होते. यात क्रमांक तीनवर आरोपीला उभे करण्यात आले. ‘दुर्गा’ श्वानाने कोयत्याच्या वासाद्वारे आरोपीला दर्शविले. त्यानंतर आरोपीला पाचव्या क्रमांकावर उभे केले तेव्हाही श्वानाने आरोपीला ओळखले, त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.