पुणे: महापालिका निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रारूप प्रभागरचनेत उपनगरांना न्याय मिळणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 2011 च्या जनगणनेनुसार होत असलेल्या या प्रभागरचनेत उपनगरांतील चार मतदारसंघांत लोकसंख्येच्या तुलनेत प्रत्यक्षात मतदारांची संख्या मोठी आहे, त्यामुळे उपनगरांतील प्रभागांची रचना करताना कमी लोकसंख्येचे प्रभाग केल्यास या भागांना जास्तीत जास्त नगरसेवक मिळतील व येथील विकासकामांचा असमतोल भरून निघण्यास मोठी मदत होणार आहे.
महापालिका प्रशासनाकडून प्रारूप प्रभागरचना करण्याचे काम सद्य:स्थितीला सुरू आहे. येत्या महिनाअखेरपर्यंत प्रारूप रचना निश्चितही होईल. त्यामुळे या प्रारूप प्रभागरचनेकडे राजकीय इच्छुकांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांचेही लक्ष लागले आहे. (Latest Pune News)
प्रभागरचनेतून पुढील पाच वर्षांच्या कालावधीत शहराच्या विकासाची दिशा ठरणार आहे. त्यामुळे कोणत्या मतदारसंघात किती प्रभाग तयार होणार आणि किती नगरसेवक मिळणार, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार, 2011 च्या जनगणनेनुसार महापालिकेची चारसदस्यीय प्रभागरचना करण्यात येत आहे. महापालिकेत समाविष्ट 32 गावांसह शहराची 2011 ची एकूण लोकसंख्या 34 लाख इतकी आहे. त्यानुसार नगरसेवकांची संख्या 165 होणार आहे, तर प्रभागांची एकूण संख्या 42 इतकी राहणार असून, त्यात 39 प्रभाग चारसदस्यीय तर 3 प्रभाग त्रिसदस्यीय होतील.
लोकसंख्येनुसार प्रभाग करताना एका प्रभागाची लोकसंख्या सरासरी 84 हजार इतकी अपेक्षित आहे. त्यात जास्तीत जास्त दहा टक्के वाढीनुसार 92 हजार आणि कमीत कमी दहा टक्केनुसार 75 हजारांचा प्रभाग असणे आवश्यक आहे. मात्र, लोकसंख्येनुसार जरी प्रभाग होणार असले तरी संबंधित प्रभागातील मतदारांची संख्या अधिक असणार आहे.
महापालिकेची 2011 ची लोकसंख्या 34 लाख 81 हजार इतकी असली, तरी प्रत्यक्षात मतदारांची संख्या 38 लाख इतकी आहे. प्रामुख्याने गेल्या पंधरा वर्षांत उपनगरांत मोठ्या प्रमाणात नागरीकरण होऊन लोकसंख्यावाढ झाली आहे. त्यामुळे जरी 2011 नुसार लोकसंख्या कागदोपत्री कमी असली, तरी प्रत्यक्षात तेथील लोकसंख्या अधिक आहे. संबंधित भागातील मतदारांच्या आकडेवारीवरून ते स्पष्ट होत आहे.
...तरच उपनगरांचा विकास होईल!
शहराच्या मध्यवस्ती भागांचा विकास झाला आहे. तर उपनगरे आणि समाविष्ट 32 गावांमध्ये अद्याप नागरी समस्या सुटलेल्या नाहीत. त्यामुळे प्रशासनाने शहराचा समतोल विकास करण्यासाठी उपनगरांमध्ये जास्तीत जास्त नगरसेवक मिळावेत यासाठी कमी लोकसंख्येचे प्रभाग उपनगरात आणि जास्त लोकसंख्येचे प्रभाग मध्यभागात केल्यास उपनगरांना जास्तीत जास्त नगरसेवक मिळून त्याचा विकास होईल.
चार मतदारसंघांसाठी 110 नगरसेवक
महापालिका प्रशासनाकडील माहितीनुसार, शहराच्या 34 लाख 81 हजार इतक्या लोकसंख्येपैकी हडपसर, खडकवासला, वडगाव शेरी आणि कोथरूड या चार विधानसभा मतदारसंघांसह समाविष्ट 32 गावांची एकूण लोकसंख्या 22 लाख 64 हजार 966 इतकी आहे. तर कसबा पेठ, पुणे कॅन्टोन्मेंट, पर्वती आणि शिवाजीनगर या चार मतदारसंघांची एकूण लोकसंख्या ही 12 लाख 16 हजार इतकी आहे. त्यामुळे उपनगरांचा समावेश असलेल्या मतदारसंघात मध्यवस्तीत मोडणार्या मतदारसंघापेक्षा दुप्पट लोकसंख्या असल्याचे स्पष्ट होत आहे.
आता शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जर प्रशासनाने प्रभागरचना करताना या उपनगरातील चार मतदारसंघांतील प्रभाग सरासरी 75 ते 80 हजार लोकसंख्येनुसार केले तरी या भागात 28 ते 30 प्रभाग होतील. त्यामध्ये साधारणपणे चारसदस्यीय 25 ते 26 आणि त्रिसदस्यीय
2 अथवा 3 प्रभाग केले तर या मतदारसंघातील नगरसेवकांची संख्या 105 ते 110 पर्यंत निश्चितपणे जाऊ शकेल. तर, उर्वरीत मध्यवस्तीमधील चार मतदारसंघांतील प्रभाग सरासरी 90 हजारांच्या लोकसंख्येनुसार केल्यास 12 ते 14 प्रभाग तयार होऊन 50 ते 54 नगरसेवक मध्यवस्तीला मिळतील.
राजकीय भूमिका महत्त्वाची ठरणार
प्रभागरचनेत राजकीय हस्तक्षेप होतात हे लपून राहिलेले नाही किंबहुना हे उघड सत्य आहे. त्यामुळे आता सत्तेत असलेल्या महायुतीचा मतदारवर्ग उपनगरांमध्येही आहे. त्यामुळे प्रभागरचनेत राजकीय भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.