पुणे: प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ, पुणे) अंतर्गत वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसवण्याच्या मोहिमेने वेग घेतला आहे. आरटीओने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार ३० जूनपर्यंत तब्बल ९ लाख ४५ हजार ९३७ वाहनांवर यशस्वीरीत्या या नंबरप्लेट्स बसवण्यात आल्या आहेत.
मात्र, अद्यापही अनेक वाहनधारकांनी या नंबरप्लेट्स बसवलेल्या नाहीत. त्या पार्श्वभूमीवर, आता आरटीओ प्रशासनाने नियम मोडणाऱ्या वाहनधारकांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास जोरदार सुरुवात केली आहे.
एचएसआरपी आकडेवारी
(दि. ३० जूनपर्यंत) - (स्रोत : आरटीओ, पुणे)
तपशील संख्या
एकूण ऑर्डर्स - 11,55,351
एकूण अपॉइंटमेंट्स -11,48,135
प्रत्यक्ष बसवलेल्या नंबरप्लेट्स - 9,45,937
आरटीओकडून प्रत्यक्ष रस्त्यावर कारवाई
आता आरटीओच्या वायुवेग पथकांकडून एचएसआरपी नसलेल्या वाहनांविरोधात प्रत्यक्ष तपासणी सुरू असून, जुन्या किंवा फॅन्सी नंबरप्लेट वापरणाऱ्यांवर मोठी दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी आपली उर्वरित फिटमेंट प्रक्रिया पूर्ण करावी.
वाहनांवर एचएसआरसीपी नंबरप्लेट बसवून घ्यावी
एचएसआरसीपी न बसविणाऱ्या वाहनमालकांचे वाहन हस्तांतरण, पत्ता बदल करणे, कर्जबोजा चढविणे व उतरविणे आदी कामांवर निर्बंध लावण्यात आते होते. यापुढे अशा वाहनमालकांच्या वाहनांची पुनर्नोंदणी, वाहनात बदल करणे, परवाना नूतनीकरण आदी सर्व कामे थांबविण्यात येणार आहेत, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे. वाहन मालक-चालकांनी १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना एचएसआरसीपी क्रमांकाची पट्टी बसवण्याबाबत कार्यवाही करावी.
वाहनांच्या सुरक्षेसाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी एचएसआरपी अनिवार्य आहे. पुणेकरांनी या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिला असून आत्तापर्यंत ९.४५ लाखांहून अधिक वाहनांचे फिटमेंट पूर्ण झाले. परंतु, ज्यांनी अद्यापही ही नंबरप्लेट बसवलेली नाही, त्यांनी दंडात्मक कारवाईपूर्वी ती बसवून घ्यावी.अर्चना गायकवाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी