पुणे: शहरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी धुडगूस घातला असून, वेगवेगळ्या घटनांमध्ये १८ लाख रुपयांचा ऐवज चोरी केला आहे. उंड्री, कात्रजमधील सुखसागरनगर, फुरसुंगी, तसेच नवी पेठेतील लोकमान्यनगर भागात या घटना घडल्या. (Latest Pune News)
कात्रजमधील सुखसागरनगर भागात एका सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी १५ लाख ९८ हजारांचे सोन्याचे दागिने लांबविले. याबाबत एकाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे अंबामाता मंदिराजवळ असलेल्या गुरुदत्त व्हिला सोसयाटीत राहायला आहेत. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून शयनगृहातील कपाटातून दागिने लांबविल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत पोलिस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत.
हडपसर-सासवड रस्त्यावरील फुरसुंगी भागात एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड आणि दागिने असा ९७ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. याबाबत एकाने फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिस उपनिरीक्षक महेश नलावडे तपास करत आहेत. नवी पेठेतील लोकमान्यनगर भागात सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी ३६ हजारांचे चार मोबाईल संच लांबविल्याची घटना घडली. याबाबत पोलिस हवालदार भुजबळ तपास करत आहेत.