पुणे : प्रेयसीचा खून करून प्रियकराने रेल्वे रुळावर उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिव्या निघोटे (वय 23, रा. लोणीकंद) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.
तर गणेश शाहूराव काळे (वय 27, रा. संगमवाडी; मूळ रा. अशोक नगर, ढगे कॉलनी, बीड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी गणेश काळेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
गणेश काळे हा मूळचा बीड जिल्ह्यातील असून, तो गेल्या काही वर्षांपासून पुण्यात राहत होता. दिव्या ही लोणीकंद भागात राहणारी होती.
गणेश आणि दिव्या हे दोघेही बंडगार्डन भागातील एका नामांकित रुग्णालयात कार्यरत होते. गणेश लॅब टेक्निशियन म्हणून तर दिव्या निघोटे नर्स म्हणून नोकरी करत होती. रुग्णालयात झालेली ओळख प्रेमात रुपांतरीत झाली होती. दोघांचे लग्न ठरणार होते. मात्र दिव्याच्या कुटुंबाला हे लग्न मान्य नव्हते.
तर काही दिवसांपूर्वीच दिव्याचे दुसरीकडे लग्न ठरले होते. शनिवारी दिव्याने कुटुंबीयांना ‘मी मैत्रिणीसोबत चित्रपट पाहायला जाते,’ असे सांगून घर सोडले; पण ती परत आली नाही. काळजीत पडलेल्या कुटुंबीयांनी काळे पडळ पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवली होती.
दरम्यान, रविवारी तळेगाव रेल्वे रुळावर एक तरुणाचा मृतदेह आढळला. तपासात तो गणेश काळे असल्याचे स्पष्ट झाले. दुपारी पोलिस गणेशच्या राहत्या खोलीत गेले असता तेथे दिव्या मृतावस्थेत सापडली. तिच्या नाकावर मार लागल्याचे आढळून. दिव्याचा खून करून गणेशने आत्महत्या केल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला असून, त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास येरवडा पोलिस करत आहेत.