पुणे : शहरात होळीसाठी झाडांच्या फांद्या तोडण्याचे प्रकार होऊ नयेत, यासाठी पुणे महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. विनापरवाना झाडे तोडणे, जाळणे किंवा झाडांना कोणत्याही प्रकारे इजा करणे हा कायद्याने गुन्हा असून, अशा प्रकारांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.
महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 2021 नुसार परवानगीशिवाय वृक्षतोड केल्यास संबंधित झाडाच्या मूल्याइतका दंड आकारला जाऊ शकतो. हा दंड एक लाख रुपयांपर्यंत असू शकतो. त्यामुळे होळीच्या निमित्ताने वृक्षतोड करू नये, असे स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे.
शहरात काही ठिकाणी होळीसाठी झाडांच्या फांद्या कापणे किंवा झाडांची छाटणी करण्याचे प्रकार घडतात. मात्र, अशा कृतींमुळे पर्यावरणाची हानी होत असून, संबंधितांवर गुन्हा दाखल होऊ शकतो, असे महापालिकेने नमूद केले आहे. वृक्ष प्राधिकरणाकडून यासंदर्भात लक्ष ठेवले जाणार असून, तक्रार आल्यास तत्काळ कारवाई केली जाणार आहे.
विनापरवाना वृक्षतोड किंवा झाडांना हानी होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तत्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तक्रारींसाठी 18001030222 हा टोल-फ्री क्रमांक, 9689900002 हा व्हॉट्सॲप क्रमांक तसेच ुुु. लेाश्रिरपळीं.र्ीिपशलेीेीिरींळेप.ेीस या संकेतस्थळाचा उपयोग करता येणार आहे.
पर्यावरणपूरक पद्धतीने होळी सण साजरा करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा आणि शहरातील झाडांचे संरक्षण करावे.अशोक घोरपडे, उद्यान विभागप्रमुख