पुणे: हिंजवडी परिसरात मुळा नदीतील मोठ्या प्रमाणात वाढलेली जलपर्णी अन् नदीतील प्रदूषक घटक निमूर्लनासाठी स्थानिकांनी कंबर कसली असून, नदीपात्राची स्वच्छता मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. गेल्या दोन वर्षांपासून शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांनी ‘क्राउड फंडिंग’च्या माध्यमातून सुमारे दोन लाख रुपये जमा करत नदी स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला.
नदीपात्रातील वाहत्या प्रवाहाला
जलपर्णीचा अडथळा ठरला आहे. परिणामी, जलपर्णी कुजून परिसरात दुर्गंधी वाढली आहे. तसेच डासांचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही गृहनिर्माण सोसायट्या या नदीच्या पाण्यावर अवलंबून असल्याने पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबतही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर रहिवाशांनी जेसीबीच्या साहाय्याने नदीतील जलवनस्पती आणि गाळ काढण्याचे काम सुरू केले आहे. या उपक्रमाला स्थानिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अनेक नागरिक प्रत्यक्ष श्रमदानही करीत आहेत. यापूर्वीही रहिवाशांनी आंदोलन, निवेदने आणि जनजागृती मोहिमा राबवून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, दीर्घकालीन उपाययोजनांबाबत ठोस पावले उचलली गेली नसल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली.
नदीतील फ्लोटिंग बॅरिअर्स त्वरित हटवण्याची मागणी
नदीपात्रातील जलपर्णी काढण्यात यावी, यासाठी प्रशासनाकडे स्थानिकांकडून वारंवार पाठपुरावा करूनही अद्यापपर्यंत ती हटविण्यात आली नाही. त्याबाबतची जबाबदारी संबंधित विभाग एकमेकांवर ढकलताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांनी पुढाकार घेऊन नदी स्वच्छतेचा उपक्रम राबवला. मात्र प्रशासनाकडून येथे जे फ्लोटिंग बॅरिअर्स टाकलेले आहेत. त्या बॅरिअर्समुळे एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचली जात आहे. ती वेळेत काढली न गेल्यामुळे प्रदूषणाचे वेगाने वाढत आहे. त्यामुळे पहिल्यांदा हे फ्लोटिंग बॅरिअर्स हटवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
बिल्डरांचे पितळ उघडे
दैनिक ‘पुढारी’ने बिल्डर नदीमध्ये बांधकामाचा राडारोडा टाकत असल्याची सर्वप्रथम बातमी दिली. ही बातमी प्रसिद्ध होताच बिल्डरांचे धाबे दणाणले आहेत. जर बिल्डरांनी हा राडा नदीतून बाहेर काढला नाही, तर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे तक्रार करू, असे नागरिकांनी ‘पुढारी’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
दैनिक ‘पुढारी’ने नदीतील राडारोडाबाबत बातमी प्रसिद्ध केल्यानंतर हिंजवडीतील गावकरी अखेर पुढे आले आहेत. त्यांच्या उपक्रमाची दखल घेऊन दै. ‘पुढारी’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्याबद्दल हिंजवडी ग््राामस्थांनी ‘पुढारी’चे आभार मानले. नागरिकांनी नदी साफ करण्याचा संकल्प केला आहे. हा आदर्श जर बिल्डरांनी घेतला तर नक्कीच नदी स्वच्छ करण्यासाठी प्रत्येकाची मदत होईल.शिवाजी बुचडे, जिल्हा परिषद सदस्य, हिंजवडी