Slum Rehabilitation Pudhari
पुणे

Pune Slum Rehabilitation: पुण्यातील टेकड्यांवरील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन होणार? उच्चस्तरीय समितीची राज्य सरकारला शिफारस

बीडीपी आणि हिलटॉप-हिलस्लोप क्षेत्रातील जमिनींचे भूसंपादन करून परवडणारी घरे देण्याचा प्रस्ताव; नगररचना योजनेचाही पर्याय सुचविला

पुढारी वृत्तसेवा

पांडुरंग सांडभोर

पुणे: शहरातील डोंगरमाथा आणि डोंगरउतारांवरील जैवविविधता उद्यान (बीडीपी) तसेच हिलटॉप-हिलस्लोप (एचटीएचएस) क्षेत्रात असलेल्या झोपडपट्ट्या आणि अस्तित्वातील वस्त्यांच्या जमिनींचे योग्य पद्धतीने भूसंपादन करून तेथील रहिवाशांचे पुनर्वसन करावे आणि त्यासाठी परवडणाऱ्या घरांची व्यवस्था करावी, अशी शिफारस उच्चस्तरीय समितीने राज्य शासनाकडे केली आहे.

महापालिका हद्दीतील समाविष्ट २३ गावांतील ९७८ हेक्टर डोंगरमाथा-डोंगरउतारावर बीडीपीचे आरक्षण आहे. त्यासाठी शासनाने निश्चित केलेला मोबदला अत्यंत कमी स्वरूपाचा असल्याने आरक्षण जागेचे भूसंपादन झालेले नाही, त्यामुळे अनेक जागांवर अनधिकृतरीत्या प्लॉटिंग झाले असून, त्यावर अनधिकृत बांधकामेही मोठ्या प्रमाणात झाली आहेत. तरी सरकारी जागांवर झोपडपट्ट्या उभ्या राहिल्या आहेत.

या वस्तुस्थितीचा रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने विचार केला आहे. त्यानुसार बीडीपी आणि हिलटॉप-हिलस्लोपमध्ये वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या झोपडपट्टीधारकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून केवळ पर्यावरण संरक्षणाच्या नावाखाली कारवाई करणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका अहवालातील शिफारशींतून करण्यात आली आहे. अशा जमिनी सरकारने योग्य भूसंपादन आणि पुनर्वसन यंत्रणेद्वारे ताब्यात घ्याव्यात. पुनर्वसन करताना परवडणाऱ्या घरांचा पर्याय उपलब्ध करून द्यावा.

तसेच, ज्या ठिकाणी आधीपासून मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे, तेथील जमिनींचे स्वरूप आणि परिस्थिती विचारात घेऊन नगररचना योजना (टाऊन प्लॅनिंग स्कीम) राबविण्याचाही पर्याय समितीने सुचविला आहे. यामुळे जमिनींची नियोजनबद्ध पुनर्रचना, पायाभूत सुविधांचे एकात्मिक नियोजन आणि पर्यावरण संवर्धन साधता येईल. या शिफारशीनंतर आता डोंगरमाथा-डोंगरउतारावरील अस्तित्वातील वस्त्यांबाबत महापालिका आणि राज्य सरकार कोणती भूमिका घेणार? याकडे लक्ष लागले आहे.

...तर जनता वसाहतीसारखा घोटाळा टाळता येणार

पर्वती पायथा येथील जनता वसाहत झोपडपट्टीच्या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याच्या नावाखाली तब्बल साडेसातशे कोटींचा लँड टीडीआरचा गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न झाला. ही जवळपास संपूर्ण झोपडपट्टी हिलटॉप-हिलस्लोपमध्ये येत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून लँड टीडीआरची प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, आता बीडीपीसह शहरातील सर्वच टेकड्यांवरील झोपडपट्ट्यांसाठी एकच धोरण निश्चित झाल्यास भविष्यात असे घोटाळे टाळता येऊ शकणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT