पुणे: महापालिकेतर्फे शहरात राबवण्यात येत असलेल्या असंसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत गेल्या सात महिन्यांत तब्बल 75 हजारांहून अधिक नागरिकांमध्ये उच्च रक्तदाबाचा (हायपरटेन्शन) त्रास आढळून आला आहे. शहरात 1 एप्रिल 2025 ते 13 फेबुवारी 2026 या कालावधीत महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत ही तपासणी करण्यात आली.
शहरात 30 वर्षांवरील सुमारे 17 लाख 89 हजार 159 नागरिक आहेत. त्यापैकी महापालिकेच्या 19 शहरी आरोग्य केंद्रे, 45 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि दवाखान्यांअंतर्गत 8 लाख 36 हजार नागरिकांची उच्च रक्तदाबासाठी तपासणी करण्यात आली. त्यापैकी 75 हजार 148 नागरिकांमध्ये उच्च रक्तदाबाचे निदान झाले आहे. महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये नागरिकांची तपासणी होत असून, एनसीडी पोर्टलवर नोंद केली जात आहे. त्यामुळे तपासणी, निदान, उपचार व फॉलोअपची डिजिटल नोंद यासाठी कमी वेळ लागत आहे.
उच्च रक्तदाबाबरोबरच मधुमेह, तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगासाठीही नागरिकांची तपासणी सुरू आहे. तपासणीत संशयित आढळलेल्या रुग्णांना पुढील निदान व उपचारांसाठी शासकीय रुग्णालयांमध्ये संदर्भित करण्यात येत आहे. आरोग्य विभागाने नागरिकांना नियमित तपासणी करून घेण्याचे, आहार आणि जीवनशैलीत बदल करण्याचे आवाहन केले आहे. वेळेवर निदान आणि उपचार झाल्यास उच्च रक्तदाबासारखे असंसर्गजन्य आजार नियंत्रणात ठेवणे शक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
मधुमेह रुग्णांची सद्य:स्थिती
कालावधी : 1 एप्रिल 2025 ते 13 फेबुवारी 2026
30 वर्षांवरील लोकसंख्या : 17,89,159
मधुमेहासाठी तपासणी : 7,65,051 नागरिक
निदान झालेले रुग्ण : 44,101
बदलती जीवनशैली, शारीरिक हालचालींचा अभाव, ताणतणाव, चुकीच्या आहाराच्या सवयी यामुळे उच्च रक्तदाबाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. विशेषतः 30 वर्षांवरील वयोगटात हा आजार अधिक प्रमाणात आढळून येत असल्याचे तपासणीतून स्पष्ट झाले आहे.डॉ. वैशाली जाधव, सहाय्यक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका