

सुरेश वाणी
नारायणगाव: तमाशाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव नगरीत यंदाच्या तमाशा हंगामाची जोरदार सुरुवात झाली आहे. दिवंगत विठाबाई भाऊ नारायणगावकर यांच्या कार्याने पावन झालेल्या या नगरीत महाराष्ट्रातील विविध फडमालकांच्या 30हून अधिक राहुट्या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे यंदाचा तमाशा हंगाम फडमालकांसाठी सुगीचा ठरणार असल्याचे चित्र आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध फडमालकांनी नारायणगाव येथे आपली कार्यालये थाटली आहेत. नारायणगाव ग््राामपंचायतीच्या वतीने फडमालकांना जागा, पिण्याच्या पाण्याची तसेच वीजपुरवठ्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुक्ताई काळोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष खैरे व ग््राामपंचायत उपसरपंच बाबू पाटे यांच्या उपस्थितीत तमाशा नगरीतील कार्यालयांचा शुभारंभ झाला.
या प्रसिद्ध फडमालकांचा सहभाग
मालती इनामदार, काळू-बाळू, विठाबाई भाऊ नारायणगावकर, भिका-भीमा सांगवीकर, तुकाराम खेडकरसह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर, मंगला बनसोडे, छाया खिलारे बारामतीकर, नीलेश कुमार-रूपाली पुणेकर, चंद्रकांत ढवळपुरीकर, आनंद लोकनाट्य तमाशा मंडळ, संध्या माने सोलापूरकर आदी.
किमान एक लाख रुपये सुपारी; खर्चाचा ताण
तमाशा बारी ठरवण्यासाठी विविध गावांतील पदाधिकारी व यात्रा समिती सदस्यांची गर्दी वाढत आहे. मोठ्या फडमालकांची सुपारी 2 लाख रुपयांहून अधिक असते, तर लहान फडमालक किमान एक लाख रुपये सुपारी आकारतात. मोठे फडमालक दुसऱ्या दिवशी ‘हजेरी’ कार्यक्रमही सादर करतात. महागाई, डिझेलचे वाढलेले दर, कलाकारांना द्यावी लागणारी मोठी उचल यामुळे एक लाख रुपयांखाली सुपारी परवडत नसल्याची खंत फडमालक मास्टर जगनकुमार वेळवंडकर यांनी व्यक्त केली.