पुणे

Pune : प्रचारसभेमुळे शहरात आज जडवाहनांना बंदी; असे असतील वाहतूक बदल

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेनिमित्त शहरातील जडवाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. सोमवारी (दि.29) सकाळी 8 ते मंगळवारी (दि.30) दुपारी बारापर्यंत हे बदल करण्यात आले आहेत.
सोलापूर रोड- थेऊर फाटा, सासवड रोड- मंतरवाडी फाटा, बोपदेव घाट रोड- खडी मशिन चौक, सातारा रोड -कात्रज चौक, सिंहगड रोड- वडगाव पूल, पौड रोड- चांदणी चौक, बाणेर रोड – हॉटेल राधा चौक, औंध रोड – राजीव गांधी पूल, जुना मुंबई महामार्ग – हॅरीश पूल, आळंदी रोड- बोपखेल फाटा, लोहगाव रोड – लोहगाव चौक, अहमदनगर रोड- थेऊर फाटा चौक या मार्गावर जडवाहने आणू नयेत, असे वाहतूक पोलिसांनी कळवले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौर्‍यानिमित्त शहरातील वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी सोमवारी (दि. 29) सायंकाळी 4 ते रात्री नऊ वाजेपर्यंत विविध रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. रेसकोर्स परिसरामधील पाण क्लब चौक रस्त्यावर दुहेरी वाहतूक करण्यात आली आहे. टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार ते टर्फ क्लब चौक रस्ता बंद करण्यात आला आहे. सोलापूर रोडवरील अर्जुन रोड ते टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार हा रस्ता बंद करण्यात आला आहे. बिशप स्कूल सर्कल ते टर्फ क्लब चौक रस्ता या कालावधीत बंद राहणार आहे. यासाठी मम्मादेवी जंक्शन येथून बेऊर रोड जंक्शन येथून इच्छितस्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गोळीबार मैदान, मम्मादेवी चौक, भैरोबानाला चौक, आंबेडकर पुतळा चौक कॅम्प, कोरेगाव पार्क जंक्शन, ताडीगुत्ता चौक, नोबल हॉस्पिटलपर्यंत वाहनांचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. सोमवारी सायंकाळी 4 ते 10 वाजेपर्यंत वरील परिसरातून जाण्यासाठी बाहेरील रस्ते उदा. नगर रोडने जाण्यासाठी पोल्ट्रीफार्म चौक ते संगमवाडी मार्गे, तसेच सोलापूर रोड ते जेधे चौक जाण्यासाठी लुल्लानगर, गंगाधाम चौक, सातारा रोड याचा वापर करावा, त्याचप्रमाणे मंतरवाडी, खडी मशीन चौक, कात्रज रोड या बाह्यवळण रस्त्याचा तसेच खराडी बायपास मुंढवा, नोबेल हॉस्पिटल रोडचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक उपायुक्त रोहिदास पवार यांनी केले आहे.

इथे आहे पार्किंगची सुविधा

पुणे- सोलापूर सासवड रोडवरून येणार्‍या चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था खालील ठिकाणी करण्यात आली आहे. भैरोबानाला ते वानवडी बाजार पोलिस चौकी चौक, वानवडी बाजार ते मम्मादेवी जंक्शन. पुणे, अहमदनगर, पिंपरी चिंचवडवरून येणार्‍यांसाठी सर्किट हाऊस ते मोरओढा, वॉर मेमोरियल ते घोरपडी रेल्वेगेट, आर्मी पब्लिक स्कूल घोरपडी गाव. पुणे, सातारा, सिंहगड व स्वारगेट परिसरातील वाहनांकरिता बेऊर रोड जंक्शन, कोयाजी रोड अंतर्गत रस्ते, तीनतोफा चौक, बीशप स्कूल परिसर. सर्व प्रकारच्या बससाठी-रामटेकडी उड्डाणपुलावरून जाऊन पुढे हडपसर इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे. सर्व व्ही. व्ही. आय.पी. यांना भैरोबानाला चौक ते आर्मी पब्लिक स्कूलदरम्यान एम्प्रेसगार्डन येथे पार्किंगची सुविधा देण्यात आली आहे.

इच्छितस्थळी जाण्यासाठी या रस्त्यांचा करा वापर

  • गोळीबार मैदार ते भैरोबानाला : गोळीबार मैदान चौक- लुल्लानगर ते इच्छित स्थळी.
  • भैरोबानाला ते गोळीबार मैदान चौक : भैरोबानाला ते लुल्लानगर ते इच्छित स्थळी.
  • मोरओढा ते भैरोबानाला : मोरओढा-घोरपडी रेल्वेगेट- बी. टी. कवडे रोडने इच्छित स्थळी.
  • वॉर मेमोरीअल ते घोरपडी ते डोबारवाडी मार्गे बी. टी. कवडे रोडने इच्छित स्थळी.
  • बी. टी. कवडे जंक्शन ते बी. टी. कवडे रोडने उड्डाणपुलावरून .
  • सदन कमांड-कौन्सिल हॉल-ब्लू नाईल मार्गे इच्छित स्थळी.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT