Heavy Vehicle Ban Pudhari
पुणे

Pune Heavy Vehicle Ban: पुणे शहरात जड-अवजड वाहनांना प्रवेशबंदी; पावसाळ्यात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

९ जुलैपासून पुढील आदेशापर्यंत निर्बंध लागू; मालवाहू वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित, मालाची चढ-उतार फक्त रात्री

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरात पावसाळ्यात जड वाहने, मालवाहू वाहने अडकण्याच्या किंवा बंद पडण्याच्या घटना घडून वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी प्रतिबंधक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये ९ जुलैपासून पुढील आदेशापर्यंत जड-अवजड वाहनांस प्रवेशबंदी केली आहे. या वाहनांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.

अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग

  • सोलापूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी केडगाव-चौफुला-न्हावरे-तळेगाव ढमढेरे-शिक्रापूर-चाकणमार्गे व उरुळी कांचन-कोरेगाव मूळ-अष्टापूर-तळेगाव ढमढेरे-शिक्रापूर-चाकणमार्गे जावे.

  • मुंबई येथून सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनांनी तळेगाव दाभाडे-चाकण-शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे-न्हावरे-केडगाव- चौफुला सोलापूर महामार्गमार्गे व तळेगाव दाभाडे-चाकण-शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे-अष्टापूर-कोरेगाव मूळ-उरुळी कांचनमार्गे तसेच कात्रज मंतरवाडी फाटा-वडकी-दिवे घाट-सासवड-जेजुरी-मोरगाव-सुपे- केडगाव चौफुला मार्गाचा वापर करावा.

  • मुंबई येथून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या वाहनांनी तळेगाव, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, अहिल्यानगर मार्गाचा वापर करावा, तर अहिल्यानगर येथून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी शिक्रापूर-चाकण-तळेगाव मार्गाचा वापर करावा.

  • सासवड येथून सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनांनी सासवड-जेजुरी-मोरगाव-सुपे-केडगाव-चौफुला मार्गाचा वापर करावा.

मालाची चढउतार रात्री करा

  • शहरात मालाची चढ-उतार करणाऱ्या वाहनांनी रात्री ११ ते सकाळी ६ वा.पर्यंत खालील मार्गाने ये-जा करावी. अहिल्यानगरकडून पुणे शहरात येणाऱ्या वाहनांनी नगर रोडने वाघोली-खराडी बायपास-शास्त्रीनगर चौक-गोल्फ क्लब चौक-आळंदी रोड जंक्शन-चंद्रमा चौक-पोल्ट्री चौक-हॅरीश ब्रिजमार्गे इच्छित स्थळी जातील.

  • सोलापूरकडून पुणे शहरात ये-जा करण्यासाठी मगरपट्टा-भैरोबानाला-लुल्लानगर चौक-गंगाधाम चौक-मार्केट यार्ड मार्गाचा वापर करावा.

  • सातारा-सांगली-कोल्हापूरकडे जाणारी वाहने बंगळुरू महामार्गमार्गे नवले ब्रिज, कात्रज चौक, मार्केट यार्ड मार्गाचा वापर करतील. तर मुंबई-नाशिककडून पुणे शहरात येणारी वाहने हॅरिश ब्रिज-बोपोडी-चंद्रमा-गोल्फ चौक, मार्केट यार्ड मार्गाचा वापर करतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT