Gultekdi Market Yard Pudhari
पुणे

Gultekdi Market Yard: गुलटेकडी मार्केट यार्ड झाले ‘चिखल यार्ड’; राडारोडा, कचरा अन् दुर्गंधीने व्यापारी-हमाल त्रस्त

पावसाचे पाणी साचल्याने रस्ते निसरडे; उघड्यावर फळविक्रीमुळे आरोग्याचा प्रश्न, कोट्यवधींच्या सेसचा हिशेब कुठे?

पुढारी वृत्तसेवा

पुणे: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी येथील फळबाजारासह बटाटा विभागाला प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अक्षरशः ‘चिखल यार्ड’चे स्वरूप आले आहे. रस्त्यांवर टाकलेला राडारोडा, पावसाचे साचलेले पाणी आणि सडलेल्या फळांच्या कचऱ्यामुळे बाजारातील रस्ते चिखलाने माखले आहेत. परिणामी, खरेदीदारांसह डोईवर मालाचे ओझे वाहणाऱ्या हमालांना जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागत आहे. तर, बटाटा विभागातही साचलेल्या कचऱ्यामुळे कमालीची दुर्गंधी पसरल्याचे चित्र आहे.

फळबाजारातील काही व्यापारी व विक्रेत्यांकडून खराब फळे, प्लास्टिकचे आवरण आणि पाला थेट रस्त्यावर फेकला जात आहे. त्यात पावसाच्या पाण्याची भर पडल्याने परिसराला बकाल स्वरूप आले आहे. काही गल्ल्यांमध्ये पाणी आणि चिखल साचल्याने नागरिकांनीच सिमेंटचे ब्लॉक टाकून त्यावरून ये-जा सुरू केली आहे. निसरड्या रस्त्यांवर पाय घसरून पडण्याचे प्रकारही घडत आहेत. गंभीर बाब म्हणजे याच अस्वच्छ परिसरात पपई, चिकू, कलिंगड, सफरचंद, मोसंबीसह विविध फळांची उघड्यावर विक्री सुरू आहे.

त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. बटाटा विभागातही नियमित स्वच्छता होत नसल्याने वारंवार चिखल होऊन दुर्गंधी पसरत आहे. बटाटा तसेच फळबाजारातून कोट्यवधी रुपयांचा सेस गोळा करणाऱ्या बाजार समितीला स्वच्छतेसाठी ठोस व्यवस्था करता येत नसेल, तर हा पैसा नेमका जातो कुठे? असा सवाल उपस्थित होत आहे. बेशिस्त व्यापाऱ्यांवर कारवाई करून बाजार आवार चिखलमुक्त करून स्वच्छ ठेवण्याची मागणी बाजार घटकांकडून होत आहे.

बाजार आवारातील फळे, कांदा, भाजीपाला आणि प्रामुख्याने बटाटा शेड परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून येते. बाजारात दररोज मोठ्या प्रमाणावर मालाची आवक होत असल्याने स्वच्छतेचे काटेकोर नियोजन आवश्यक आहे. पावसामुळे रस्त्यांवर चिखल होत असून, व्यापाऱ्यांसह खरेदीदार आणि विशेषतः हमालांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. बाजार समितीने नियमित स्वच्छतेबरोबरच पाणी न साचण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी. व्यापाऱ्यांनीही खराब फळे व कचरा रस्त्यावर न टाकता बाजार स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे.
सौरभ कुंजीर, अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशन
पावसामुळे काही ठिकाणी चिखल आणि पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली आहे. संबंधित ठिकाणांची पाहणी करून राडारोडा व कचरा तातडीने हटविण्याच्या सूचना स्वच्छता यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. तसेच, बहुतांश ठिकाणी स्वच्छताही करण्यात आली आहे. खराब फळे अथवा कचरा रस्त्यावर टाकणाऱ्या व्यापाऱ्यांनाही सूचना देण्यात येतील. नागरिक, व्यापारी आणि हमालांची गैरसोय होणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील.
नितीन चौरे, विभागप्रमुख, फळे आणि तरकारी बाजार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT