Hydroponic Ganja Pudhari
पुणे

Hydroponic Ganja Smuggling: सोनेरी तस्करी मागे पडली; आता ‘ग्रीन गोल्ड’चा वाढता धोका

पुणे विमानतळावर हायड्रोपोनिक गांजाच्या जप्तीनंतर ड्रग्ज तस्करीचे नवे जाळे समोर आले असून महाराष्ट्रात चिंतेत वाढ झाली आहे

पुढारी वृत्तसेवा

महेंद्र कांबळे

पुणे: एकेकाळी महाराष्ट्रातील विमानतळांवर सर्वाधिक डोकेदुखी ठरत होती ती सोन्याची तस्करी. दुबई, सिंगापूर, थायलंडसह विविध देशांतून शरीरात, कपड्यांमध्ये, इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये किंवा बॅगमध्ये लपवून सोने आणण्याचे प्रकार सातत्याने उघड होत होते. मात्र, गेल्या दोन वर्षांत तपास यंत्रणांनी सोन्याच्या तस्करीवर अंकुश लावल्याने तस्करांनी आपला मोर्चा नव्या आणि अधिक धोकादायक व्यवसायाकडे वळवला आहे. आता महाराष्ट्रात 'सोनेरी तस्करी'ची जागा 'ग्रीन गोल्ड' अर्थात हायड्रोपोनिक गांजाने घेतल्याचे समोर आले आहे.

पुणे विमानतळावर मार्च २०२६ मध्ये पुणे एअर कार्गो कॉम्प्लेक्समध्ये थायलंडहून आलेल्या 'मँडरिन ऑरेंज'च्या शिपमेंटमध्ये ७६.५८ किलो हायड्रोपोनिक गांजा आढळून आला. २६.८० कोटी रुपये किमतीचा हा साठा महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या मोठ्या कारवायांपैकी एक मानला जातो. त्यानंतर २० जून २०२६ रोजी बँकॉकहून आलेल्या बेवारस बॅगमधून आणखी २१.५ किलो गांजा जप्त केला.

याआधी विमानाच्या शौचालयात लपवलेला गांजा, चॉकलेट बॉक्समध्ये भरलेला ड्रग्ज साठा अशा अनेक कारवायाही समोर आल्या आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, काही वर्षांपूर्वी विमानतळांवर सर्वाधिक चिंता सोन्याच्या तस्करीची होती. आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आता महाराष्ट्रासमोरचे खरे आव्हान म्हणजे 'ग्रीन गोल्ड'च्या माध्यमातून राज्यात शिरकाव करणाऱ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियांना रोखणे.

सोन्यापासून ड्रग्जकडे का वळले तस्कर?

तपास यंत्रणांच्या मते, थायलंडमध्ये काही लाख रुपयांत उपलब्ध होणारा एक किलो हायड्रोपोनिक गांजा पुणे, मुंबई आणि इतर महानगरांमध्ये ७० लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत विकला जातो. तुलनेने कमी गुंतवणूक आणि प्रचंड नफा यामुळे तस्करांचे लक्ष या व्यवसायाकडे वळले आहे. जुलै २०२४ मध्ये केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्कात कपात केल्यानंतर वैध आयात वाढली आणि तस्करीतून मिळणारा फायदा कमी झाला. दुसरीकडे, विमानतळांवरील अत्याधुनिक स्कॅनिंग यंत्रणा, डीआरआय आणि कस्टम्सच्या कारवाया तसेच प्रवाशांच्या प्रोफाइलिंगमुळे सोन्याची तस्करी अधिक धोकादायक बनली. परिणामी, अनेक तस्करी नेटवर्कने ड्रग्जचा मार्ग स्वीकारल्याचे दिसून येत आहे.

पुणे-मुंबई बाजारपेठ तस्करांच्या निशाण्यावर

महाराष्ट्रातील पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबई परिसरात हायड्रोपोनिक गांजाची मागणी झपाट्याने वाढत असल्याचे तपासातून समोर आले आहे. पार्टी कल्चर, उच्चभ्रू वर्तुळातील वाढता वापर, ऑनलाइन डिलिव्हरी नेटवर्क आणि तरुणांमध्ये निर्माण झालेले आकर्षण यामुळे या अमली पदार्थाला मोठी बाजारपेठ मिळाली आहे.

तस्करीच्या पद्धतीही बदलल्या

पूर्वी शरीरात सोने लपविणे, सोन्याची पेस्ट बनविणे किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये सोने लपविण्याच्या घटना समोर येत होत्या. आता फळांच्या पेट्या, चॉकलेट बॉक्स, कपड्यांची पार्सल, खाद्यपदार्थ आणि कार्गो शिपमेंटमध्ये व्हॅक्यूम पॅकिंग करून हायड्रोपोनिक गांजा आणला जात आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये उघडकीस आलेल्या इनडोअर गांजा लागवडीच्या प्रकरणांमुळे केवळ आयातच नव्हे, तर स्थानिक पातळीवर उत्पादन आणि वितरणाचे जाळेही विस्तारत असल्याची भीती व्यक्त होत आहे.

तरुण पिढीसमोर मोठा धोका

तपास अधिकाऱ्यांच्या मते, सोन्याची तस्करी ही प्रामुख्याने आर्थिक गुन्हा होती. मात्र, हायड्रोपोनिक गांजाची तस्करी थेट समाज आणि विशेषतः तरुणांच्या आरोग्यावर परिणाम करणारी आहे. व्यसनाधीनता, गुन्हेगारी, आर्थिक शोषण आणि आंतरराष्ट्रीय ड्रग्ज नेटवर्कशी वाढणारे संबंध यामुळे हा धोका अधिक गंभीर मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT