पुणे: आंबट-गोड चवीच्या द्राक्षांचा हंगाम सुरू झाला असून, गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात नव्या हंगामातील द्राक्षे दाखल होऊ लागली आहेत. रविवारी बारामती आणि फलटण परिसरातून ‘तास-ए-गणेश’ जातीच्या दोन ते अडीच टन द्राक्षांची आवक झाली. हंगामाच्या सुरुवातीला आवक मर्यादित असल्याने घाऊक बाजारात दहा किलोला ८०० ते १२०० रुपयांचा दर मिळत आहे.
सध्या बारामती आणि फलटण परिसरातून द्राक्षांची आवक सुरू असून, पुढील आठवडाभर एक दिवसाआड आवक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आवक नियमित होऊन या द्राक्षांच्या दहा किलोचे दर ६०० ते ८०० रुपयांपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे.
येत्या दहा दिवसांत सांगली, अहिल्यानगर आणि सोलापूर परिसरातील द्राक्षांचा हंगामही सुरू होणार आहे. त्यामुळे बाजारातील आवक वाढणार असून, ‘तास-ए-गणेश’सह जम्बो, सुपर सोनाका, सोनाका आणि माणिकचमन आदी जातींची द्राक्षे विक्रीसाठी उपलब्ध होतील, अशी माहिती द्राक्षांचे व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली.