पुणे: शहरात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ग््राँड सायकल स्पर्धेचा महत्त्वाचा टप्पा आज शुक्रवारी (दि.23) पार पडणार असून, या पार्श्वभूमीवर स्पर्धेच्या मार्गावरील अडथळे तत्काळ दूर करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाने दिले आहेत. स्पर्धा सुरळीत, सुरक्षित आणि आंतरराष्ट्रीय निकषांनुसार पार पडावी, यासाठी स्पर्धा मार्गावर लावलेले सर्व फ्लेक्स, बॅनर्स आणि जाहिराती तत्काळ हटविण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिले आहेत.
ग््राँड सायकल स्पर्धेला देश-विदेशातून नामवंत सायकलपटू, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमी सहभागी झाले आहेत. त्यामुळे पुण्याची प्रतिमा जागतिक पातळीवर अधोरेखित होणार आहे. या स्पर्धेदरम्यान कोणताही दृश्य किंवा वाहतूक अडथळा निर्माण होऊ नये, तसेच खेळाडूंच्या सुरक्षिततेला धोका पोहोचू नये, यासाठी महापालिकेने विशेष दक्षता घेतली आहे.
स्पर्धा मार्गावर अनेक ठिकाणी राजकीय, सामाजिक तसेच व्यावसायिक स्वरुपाचे फ्लेक्स लावण्यात आले असून, त्यामुळे रस्त्याच्या कडेला अडथळे निर्माण होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याची दखल घेत अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी संबंधित विभागांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या कारवाईत स्पर्धेच्या मार्गावर येणारे सर्व अनधिकृत फ्लेक्स काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर शहरभर लावण्यात आलेल्या नगरसेवकांच्या ‘शुभेच्छा’ देणाऱ्या फ्लेक्सवर कारवाई कधी होणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. पुणे शहरातील विविध चौक, प्रमुख रस्ते, उड्डाणपूल, प्रवेशद्वार आणि सार्वजनिक ठिकाणी नगरसेवकांच्या वाढदिवस, अभिनंदन, निवडणूक विजय किंवा विविध कार्यक्रमांच्या शुभेच्छांचे मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स लावलेले दिसून येतात.
विशेष म्हणजे, जाहिरात फलक धोरण, न्यायालयीन आदेश आणि महापालिकेच्या नियमांनुसार सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत फ्लेक्स लावण्यास बंदी असतानाही अशा फ्लेक्सवर नियमितपणे कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिक आणि सामाजिक संस्थांकडून केला जात आहे. एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा स्पर्धेसाठी मात्र तत्काळ कारवाई होते, पण राजकीय शुभेच्छा फ्लेक्स वर्षानुवर्षे तसेच राहतात, याकडे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ग््राँड सायकल स्पर्धेच्या निमित्ताने महापालिकेने कारवाईचा धडाका लावला असला, तरी ही कारवाई फक्त स्पर्धेपुरती मर्यादित न ठेवता सर्वच अनधिकृत आणि नियमबाह्य फ्लेक्सवर समानपणे होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नगरसेवकांच्या शुभेच्छा फ्लेक्सवर कधी आणि कशा प्रकारे कारवाई होणार, याबाबत महापालिका प्रशासनाकडून अद्याप स्पष्ट भूमिका मांडण्यात आलेली नाही.
कारवाईसाठी स्वतंत्र अधिकारी नेमणार
शहरातील फ्लेक्सवरील कारवाईबाबत माहिती देताना अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. म्हणाले, 15 क्षेत्रीय कार्यालयांत फ्लेक्सवरील कारवाई तीव करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय 2 ते 3 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. हे कर्मचारी रस्त्यांची पाहणी करून फ्लेक्स काढतील. तसेच थकबाकी यासारखे प्रश्न देखील हाताळतील. येत्या काही दिवसांत शहर फ्लेक्समुक्त करण्यासाठी कारवाई तीव करण्यात येणार आहे.