

पुणे: शहरातील सांडपाणी व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा गाठत वारजे, मुंढवा आणि वडगाव बुद्रुक येथील तीन सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) येत्या सोमवार (दि. 26 जानेवारी) पासून सुरू करण्यात येणार आहेत. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या प्रकल्पांचे उद्घाटन होणार असून, प्रारंभी प्रकल्पांचा ट्रायल रन घेतला जाणार आहे. पुढील तीन ते चार महिन्यांत हे प्रकल्प पूर्णक्षमतेने कार्यरत होतील, अशी माहिती पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.
पुणे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, त्याच प्रमाणात सांडपाण्याचे प्रमाणही वाढले आहे. नदीप्रदूषण रोखणे, पर्यावरणाचे संवर्धन करणे तसेच शुद्ध पाण्याचा पुनर्वापर वाढवणे, या उद्देशाने महापालिकेने विविध भागांत सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून वारजे, मुंढवा आणि वडगाव बुद्रुक येथील हे तीन प्रकल्प पूर्णत्वास आले आहेत.
मुंढवा येथील एसटीपी प्रकल्पाची क्षमता 20 एमएलडी (मिलियन लिटर प्रतिदिन) इतकी आहे. वारजे येथील प्रकल्प 28 एमएलडी, तर वडगाव बुद्रुक येथील प्रकल्पाची क्षमता 26 एमएलडी इतकी आहे. या तिन्ही प्रकल्पांमुळे एकूण 74 एमएलडी सांडपाणी शुद्धीकरणाची क्षमता पुणे शहराला उपलब्ध होणार आहे. प्रारंभीच्या टप्प्यात प्रकल्पांमध्ये येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया सुरू केली जाईल. यावेळी यंत्रसामग््राी, विद्युत व्यवस्था, पाइपलाइन, तसेच संपूर्ण प्रक्रिया प्रणालीची तांत्रिक चाचणी केली जाणार आहे. या कालावधीत आवश्यक त्या सुधारणा व समायोजन करण्यात येतील.
अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले की, 26 जानेवारीपासून तिन्ही प्रकल्पांमध्ये सांडपाणी प्रक्रिया सुरू होईल. सुरुवातीला ट्रायल रन घेतला जाईल. तीन ते चार महिन्यांत सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करून हे प्रकल्प शंभर टक्के क्षमतेने कार्यरत केले जातील. हे प्रकल्प जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था (जायका) यांच्या सहकार्याने उभारण्यात आले असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सांडपाणी शुद्धीकरण करण्यात येणार आहे. शुद्ध केलेले पाणी उद्यानांना पाणीपुरवठा, औद्योगिक वापर तसेच काही ठिकाणी पुनर्वापरासाठी वापरण्याचा महापालिकेचा मानस आहे. त्यामुळे स्वच्छ पाण्यावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
शहरातील इतर भागांतही एसटीपी प्रकल्पांची कामे सुरू असून, येत्या काळात पुणे शहर सांडपाणी शुद्धीकरणाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. नियोजनबद्ध पद्धतीने हे प्रकल्प कार्यान्वित झाल्यास भविष्यातील लोकसंख्या वाढ लक्षात घेता सांडपाणी व्यवस्थापनाची समस्या मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे.