Pune Graduate Teachers Constituency Election Pudhari
पुणे

Pune Graduate Teachers Constituency Election: पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी भाजपने दिले सुशिक्षित उमेदवार; फडणवीसांचा विश्वास

डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारासाठी संस्थाचालकांशी संवाद; पुण्याच्या विकासासाठी ५० हजार कोटींच्या गुंतवणुकीचा दावा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही सत्तेसाठीचे मताधिक्य मिळविले आहे. केवळ सत्तेच्या समीकरणासाठी नव्हे, तर तरुणांचे आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे सुशिक्षित आणि सक्षम उमेदवार आम्ही पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी दिले आहेत. पुण्यातील सर्व क्षेत्रांतील संस्थाचालक या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहून त्यांना निवडून देतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केला. दरम्यान, या पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी भाजपला पसंती दिल्यास राज्यात आणि देशात सुरू असलेल्या कामाला सुजाण मतदारांची मान्यता मिळाल्याचा संदेश सर्वत्र जाईल, असा उल्लेखही त्यांनी केला.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हॉटेल मॅरिएट येथे मुख्यमंत्री यांनी शिक्षण, बँकिंग, सहकार आणि इतर क्षेत्रांतील पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. या वेळी निवडणुकीचे प्रचारप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, पदवीधर मतदारसंघासाठीच्या उमेदवार डॉ. स्मिताताई जाधव, शिक्षक मतदारसंघासाठी असलेले उमेदवार कौस्तुभ गावडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू नितीन कळमारकर, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे आणि इतर क्षेत्रातील संस्थाचालक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले की, विधानपरिषद ही वरिष्ठ सभागृहाची भूमिका बजावते. समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधित्व आणि कायदे करताना वेगवेगळे दृष्टिकोन मांडले जाणे अपेक्षित आहे. मात्र, अलिकडच्या काळात या सभागृहात अपेक्षित दर्जाचे काम होत नाही, त्यामुळे भाजपने उमेदवार निवडताना त्यांचे शिक्षण, अनुभव आणि दूरदृष्टी या निकषांना महत्त्व दिले आहे. पदवीधर मतदारसंघातील डॉ. स्मिता जाधव यांचा उच्च शिक्षण आणि व्यवस्थापन क्षेत्रातील अनुभव तसेच त्यांच्याकडे असलेली स्वतंत्र दृष्टी आहे, तर शिक्षक मतदारसंघातील कौस्तुभ यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदानही कमी वयात अधिक आहे.

राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारकडे पूर्ण बहुमत आहे. विधानपरिषदेतही भाजपला स्वतःच्या बळावर बहुमत मिळालेले असल्याने या निवडणुकीतील जागा बहुमतासाठी आवश्यक असल्याचा दावा आपण करणार नाही, असे फडणवीस यांनी नमूद केले. चांगले लोकप्रतिनिधी निवडून जावेत आणि त्यांच्या माध्यमातून वरिष्ठ सभागृहाचे कामकाज अधिक प्रभावी व्हावे, ही भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी भाजपला पसंती दिल्यास राज्यात आणि देशात सुरू असलेल्या कामाला सुजाण मतदारांची मान्यता मिळाल्याचा संदेश जाईल. सरकारच्या कामाबाबत या घटकांमध्ये कितपत समाधान आहे, याची चाचपणीही या निवडणुकीतून होईल, असे फडणवीस म्हणाले. त्यामुळे ही निवडणूक केवळ उमेदवार निवडण्यापुरती मर्यादित नसून, सरकारच्या कामाविषयी मतदारांचा प्रतिसाद जाणून घेण्याची संधी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

या वेळी पदवीधर मतदारसंघासाठी असलेल्या उमेदवार डॉ. स्मिताताई जाधव म्हणाल्या की, देशात, राज्यात सर्वत्र नवरात्रोत्सव सुरू असताना ऐनवेळी भाजपने मला कमळ हातात देऊन माझ्यावर विश्वास दाखवला, त्याचा मला खूप अभिमान आहे. नऊ कलमी कार्यक्रमानुसार पदवीधर आणि शिक्षण क्षेत्रातील नावीन्यपूर्ण बदल तालुकास्तरावरून सुरू करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. तर, उमेदवार गावडे यांनी राज्यात शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न, ग्रामीण पातळीवर येणाऱ्या अडचणी, महिला शिक्षकांपासून त्यांचे मानधन, रजेसंदर्भातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणार आहे, असे सांगितले.

मोदी सरकारच्या विकासकामांचा उल्लेख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षांत देशात विविध क्षेत्रांत परिवर्तन झाल्याचा दावा फडणवीस यांनी केला. भारताच्या आर्थिक विकासाचा वेग, पायाभूत सुविधांची उभारणी, नवोन्मेष आणि डिजिटल व्यवहार, सात टक्क्यांहून अधिक विकासदर, जीसीसीमध्ये पुण्याचा पहिला क्रमांक लागेल, नवोन्मेष क्षेत्रात जागतिक प्रगती, स्टार्टअप परिसंस्थेत देशाची भरारी, यूपीआय प्रणाली आदी विषयांकडे लक्ष वेधून भाजपच्या कामाचा लेखाजोखा मांडला. सदृढ लोकशाहीबद्दल मांडलेल्या विचारांबद्दल उपस्थित संस्थाचालकांना दिलेले सल्ले भावले असल्याचे कार्यक्रमानंतर झालेल्या चर्चेतून दिसून आले.

पुण्याचा कायापालट होणार

पुण्याच्या विकासाचा मुद्दा मांडताना फडणवीस यांनी शहरातील वाहतूक कोंडी आणि अपुरे रस्ते, पायाभूत सुविधांकडे लक्ष वेधले. मुंबईनंतर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यात पुण्याची महत्त्वाची भूमिका आहे. त्यासाठी पुण्यातील वाहतूकव्यवस्था सुधारण्यासाठी बाह्य व अंतर्गत वर्तुळाकार मार्ग, उच्चक्षमता द्रुतगती मार्ग (एचसीएमटीआर), बोगद्यांचे जाळे, उड्डाणपूल, मेट्रो आणि अंतिम टप्प्यातील जोडणी, अशा विविध प्रकल्पांवर काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या प्रकल्पांसाठी एकूण ५० हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

मतदारांना केंद्रापर्यंत आणण्याचे आवाहन

सशक्त लोकशाहीसाठी सुजाण नागरिकांनी मतदानात सहभागी होणे आवश्यक आहे. मात्र, गेल्या विधानपरिषद निवडणुकीत पुण्यात मतदानाची टक्केवारी कमी राहत असून, २० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाल्याची नोंद आहे. त्यामुळे शिक्षक, पदवीधर आणि संबंधित संस्थांतील मतदारांशी संपर्क साधून त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT