Legislative Election 2026 Pudhari
पुणे

Pune MLC Election 2026: भाजपच्या प्रचाराचा नारळ आज फुटणार; डॉ. स्मिता योगेश जाधव, कौस्तुभ गावडे यांच्यासाठी नेतेमंडळी मैदानात

पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता जाधव, तर शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे उमेदवार; शिवाजीनगरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन

पुढारी वृत्तसेवा

पुणे: विधान परिषदेच्या पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजप-महायुतीने प्रचाराचे बिगुल वाजवण्याची तयारी केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.९) दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला औपचारिक सुरुवात होण्याबरोबरच भाजपची संघटनात्मक यंत्रणाही सक्रिय होणार आहे.

शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेजच्या बॅडमिंटन हॉलशेजारील सभागृहात सायंकाळी ५ वाजता हा प्रचार शुभारंभाचा कार्यक्रम होणार आहे. निवडणूक प्रमुख आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी ही माहिती दिली.

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. स्मिता जाधव, तर पुणे शिक्षक मतदारसंघासाठी कौस्तुभ गावडे हे भाजप-महायुतीचे उमेदवार आहेत. दोन्ही मतदारसंघांतील पदवीधर आणि शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पक्षाकडून संघटनात्मक पातळीवर तयारी सुरू आहे.

उमेदवारांच्या प्रचाराची दिशा आणि पुढील नियोजन या कार्यक्रमातून स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाला निवडणूक प्रभारी आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, सहप्रभारी तथा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, सहनिवडणूक प्रमुख शरद लाड, प्रशम कोल्हे, तसेच शहर भाजप अध्यक्ष धीरज घाटे उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, पुणे विभागातील विधान परिषद निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबरला मतदान होणार असून, २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ९ ऑक्टोबर आहे. त्यामुळे प्रचाराचा शुभारंभ होत असतानाच उमेदवारीचे अंतिम चित्रही स्पष्ट होण्याच्या टप्प्यावर आहे.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणूक ही महायुतीसाठी महत्त्वाची मानली जात असून, दोन्ही जागांसाठी पक्षाने स्वतंत्र संघटनात्मक जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. त्यामुळे शुक्रवारच्या प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT