मंचर: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत युवासेना कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर यांनी वरिष्ठ नेतृत्वाच्या सूचनेनुसार उमेदवारी अर्ज मागे घेत महायुतीच्या भाजप उमेदवार सौ. स्मिताताई योगेश जाधव यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. युतीधर्म आणि पक्षनिष्ठेला प्राधान्य देत त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील तसेच महायुतीतील वरिष्ठ नेतृत्वाच्या सूचनेनुसार बांगर यांनी माघार घेतली, त्यांच्या निर्णयामुळे महायुतीच्या एकजुटीला बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव (खडकी) येथील सामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या सचिन बांगर यांनी भारतीय विद्यार्थी सेना, युवासेना आणि शिवसेनेच्या माध्यमातून राज्यस्तरावर संघटनात्मक कार्य केले आहे.
पदवीधर मतदारसंघासाठी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह २० हजारांहून अधिक पदवीधर मतदारांची नोंदणी केली आहे. पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात त्यांचे कार्यकर्त्यांचे जाळे आहे. बांगर यांच्या संघटनात्मक अनुभवाचा आणि पदवीधर मतदारांशी असलेल्या संपर्काचा महायुतीच्या उमेदवाराला फायदा होणार आहे.
सचिन बांगर यांच्या संघटनात्मक कार्याची दखल घेऊन शिवसेनेच्या वतीने त्यांचा योग्य मानसन्मान राखला जाईल आणि आगामी काळात सरकारच्या माध्यमातून योग्य संधी दिली जाईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.