प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे: शहरात ससून रुग्णालय, औंध जिल्हा रुग्णालय, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये खासगी रुग्णालयांच्या तुलनेत कमी दरात सिटी स्कॅन, एमआरआय या तपासण्या केल्या जातात. खासगी रुग्णालयांमधील दर परवडत नाहीत आणि शासकीय रुग्णालये मोफत उपलब्ध करून देत नाहीत, अशा कात्रीत गरीब रुग्ण सापडले आहेत. शासकीय रुग्णालयांमध्ये जाणा-या रुग्णांची संख्या जास्त असल्याने सीटी स्कॅन आणि एमआरआय यंत्रणा अपुरी पडत आहे.
महापालिका रुग्णालयांमधील स्थिती काय?
महापालिका रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी येणाऱ्या गरीब आणि गरजू रुग्णांची संख्या जास्त असते. बरेच जण रोजंदारीवर काम करणारे मजूर, झोपडपट्टीत राहणारे लोक असतात. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेच्या दरापेक्षा 1 ते 5 टक्के कमी दराने तपासण्या केल्या जातात. सीटी स्कॅन, एमआरआयसारख्या तपासण्यांचा खर्च 2 ते 5 हजार रुपयांच्या घरात असतो. मात्र, गरीब रुग्णांना तोही परवडणारा नसतो. परिणामी, महापालिकेची आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याची मागणी केली जात आहे.
औंध जिल्हा रुग्णालयातील परिस्थिती काय?
औंध जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णांना एमआरआय तपासणीसाठी तब्बल 3 ते 4 किलोमीटर अंतर पार करावे लागते. रुग्णालयात एमआरआय यंत्रणा उभारण्याचे कंत्राट दोन वर्षांपूर्वी देऊनही संबंधित खासगी संस्थेने अद्याप मशीन बसवले नाही. मुंबईस्थित ‘युनिक वेलनेस सेंटर’ या संस्थेला नोव्हेंबर 2023 मध्ये सीटी स्कॅन आणि एमआरआय केंद्र सुरू करण्याचा ठेका दिला होता. करारानुसार फेबुवारी 2024 पर्यंत सेवा सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, आजतागायत केवळ सीटी स्कॅन मशिन बसवण्यात आले असून एमआरआय सेवा अद्याप सुरू झालेली नाही. संबंधित संस्थेने सिव्हिल सर्जन यांना पत्र लिहून देयकांचा मोठा भाग थकित असल्याचा दावा केला आहे.
ससून रुग्णालयातील परिस्थिती काय?
ससून रुग्णालयात सध्या दोन सीटी स्कॅन मशिन आहेत. त्यापैकी एक मशीन आपत्कालीन विभागात तातडीच्या रुग्णांसाठी ठेवण्यात आले आहे. दुसऱ्या मशीनवर दिवसाला साधारणपणे 50 रुग्णांचे स्कॅन होतात. शासनाचे ठरवून दिलेल्या दरानुसार स्कॅनसाठी साधारणपणे 300 ते 400 रुपये खर्च होतात. मात्र, सिटी स्कॅनसाठी बरेचदा आठवडा-दीड आठवडयाचे ‘वेटिंग’ असते. ससून रुग्णालयात एक एमआरआय मशीन आहे. नॉर्मल एमआरआयसाठी 2200 रुपये, तर कॉन्ट्रास्ट एमआरआयसाठी साधारणपणे 3000 रुपये खर्च येतो. एमआरआयसाठी दोन आठवडे ते महिन्याभरापर्यंतचे वेटिंग असते.
रुग्णालयातर्फे शासनाकडे एक एमआरआय आणि एक सीटी स्कॅन मशिनची मागणी करण्यात आली आहे. नवीन 11 मजली इमारतीतील तळमजल्यावर सीटी स्कॅन आणि एमआरआय यंत्रणा सुरू करण्याचा निर्णय विचाराधीन आहे.डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, ससून रुग्णालय
ऑगस्ट 2024 पासून आम्ही संबंधित संस्थेला आणि राज्य सरकारला अनेक वेळा पत्रव्यवहार करून एमआरआय मशिन बसवण्याची मागणी केली आहे. सध्या रुग्णांना तपासणीसाठी बाहेर जावे लागते, जिथे त्यांना मोफत सेवा दिली जाते. जुलै 2025 मध्ये संबंधित संस्थेला कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे.डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक, औंध जिल्हा रुग्णालय