पुणे: पुणे महानगर प्रदेशाला (पीएमआर) जागतिक स्तरावरील ‘ग्लोबल ग््राोथ हब’ म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलली जात असून, यासाठी सविस्तर विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सल्लागार म्हणून नियुक्त ‘मॅकेंझी’ कंपनीमार्फत हा अहवाल तयार केला जाणार असून, तो प्रथम नीती आयोगाकडे सादर होऊन जून महिन्यात राज्य सरकारकडे सुपूर्त केला जाणार आहे. राज्य सरकारने पुण्याला जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
या पार्श्वभूमीवर नीती आयोगाच्या पुढाकारातून पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी व्यापक योजना आखण्यात आली आहे. वित्त आयोगाचे अध्यक्ष नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पुण्यात ‘पुणे ग््राोथ हब’ संदर्भात कार्यकारी समितीची बैठक पार पडली. या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्यासह पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, रेल्वे आणि रस्ते विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत पुणे शहर आणि परिसरातील सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित विकासकामांचा सखोल आढावा घेण्यात आला. रस्ते, रेल्वे, उड्डाणपूल, मेट्रो, भूमिगत बोगदे यासारख्या पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य देण्यात येणार आहे. औद्योगिक आणि निवासी क्षेत्राचा समतोल विकास साधण्यासाठी एमआयडीसी क्षेत्रांचा विस्तार तसेच पुरंदर विमानतळ परिसरात गृहप्रकल्प, वेलनेस सेंटर, कृषी पर्यटन आणि साहसी क्रीडा सुविधा उभारण्याच्या शक्यता तपासल्या जात आहेत.
याशिवाय शहरासमोरील पाणीटंचाई, वाहतूक कोंडी आणि सांडपाणी व्यवस्थापन, या गंभीर समस्यांवर प्रभावी उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला. विविध विभागांकडून राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांचा आढावा घेऊन त्यानुसार ‘मॅकेंझी’कडून अंतिम आराखडा तयार केला जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर पुण्याचा नियोजनबद्ध आणि वेगवान विकास साधण्याचा प्रयत्न असून, आराखडा सादर झाल्यानंतर प्राधान्याने निवडलेल्या प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या प्रकल्पांना गती मिळण्याची शक्यता
समृद्धी महामार्गाशी जोडणी, पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्ग, कल्याण-भीमाशंकर मार्ग तसेच पुणे-बंगळुरू महामार्ग या महत्त्वाच्या प्रकल्पांना ‘पुणे ग््राोथ हब’ संकल्पनेमुळे गती मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सर्व विभागांच्या समन्वयातून अहवाल तयार केला जाईल, अशी माहिती दिली.