Pune Student Protest Pudhari
पुणे

Pune Student Protest: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात जनआक्रोश; हजारो विद्यार्थ्यांचा तिरंगा मोर्चा, घोषणांनी दणाणला लाल महाल

'जेन-झी'च्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचे आंदोलन; शिक्षण व्यवस्था, पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या प्रश्नांवर केंद्र सरकारला घेरले

पुढारी वृत्तसेवा

पुणे: ‘इन्कलाब झिंदाबाद...’, ‘भारत माता की जय...’, ‘धर्मेंद्र प्रधान... राजीनामा द्या..." अशा घोषणांनी शुक्रवारी (दि. २४) दुपारी शहरातील लाल महाल चौक परिसर दणाणून गेला. 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या जेन-झीच्या वतीने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात हजारोंच्या संख्येने तरुण-तरुणींसह चिमुकल्यांनी सहभाग घेतला. अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाची तमा न बाळगता आंदोलनकर्त्यांनी हातात भारतीय ध्वज, संविधानाच्या प्रती, भगतसिंग, शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची छायाचित्रे आणि विविध व्यंगात्मक फलक घेऊन शहराच्या मध्यवर्ती भागातून मोर्चा काढत आपला रोष व्यक्त केला.

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दुपारी एक वाजल्यापासून शहराच्या विविध भागांतून तरुणाई लाल महाल चौकात जमा होऊ लागली होती. कोणाच्या हातात संविधान होते, तर कोणाकडे स्वातंत्र्यवीर भगतसिंग यांचे छायाचित्र. अनेकांनी शिक्षण व्यवस्था, युवकांचे प्रश्न आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर भाष्य करणारे फलक तयार केले होते. काहींनी राजकीय नेते, उद्योगपती आणि कलाकारांवरील व्यंगचित्रांच्या माध्यमातूनही आपली भूमिका मांडली. मोर्चादरम्यान डफाच्या तालावर घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी वातावरण भारावून टाकले.

स्पीकरच्या माध्यमातूनही राजीनाम्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. पावसाच्या सरी कोसळत असतानाही लाल महाल चौकाच्या चारही दिशांनी युवक-युवतींचे लोंढे आंदोलनस्थळी दाखल होत होते. व्यंगात्मक आणि लक्षवेधी फलकांसोबत छायाचित्रे काढण्यासाठी तरुणाईमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. आंदोलनादरम्यान भारतीय ध्वज हातात घेत अनेक युवक ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत होते. संविधानाच्या मूल्यांचे संरक्षण आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांवर केंद्र सरकारने गंभीर भूमिका घ्यावी, अशी भावना अनेक आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

मोर्चा सुरू होण्यापूर्वी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. टाळ्यांचा कडकडाट, डफाचा आवाज आणि घोषणांचा जोश यामुळे आंदोलनाला वेगळेच स्वरूप प्राप्त झाले. दुपारी साडेतीनच्या सुमारास लाल महाल चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. कसबा पेठ, रास्ता पेठ मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. तरुणाईने हाती घेतलेल्या या आंदोलनाकडे नागरिकही मोठ्या उत्सुकतेने पाहित असल्याचे दिसून आले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मार्गावर मोठा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हातात तिरंगी झेंडे आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा, पेपरफुटीचे सूत्रधार कोण? अशा विविध मागण्यांचे फलक घेऊन हजारो तरुण- तरुणी रस्त्यावर उतरले होते.

लालमहाल चौकातून निघालेली ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पोहोचल्यानंतर तिचे रूपांतर भव्य सभेत झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला. लढेंगे जितेंगे, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, इन्कलाब जिंदाबाद... भारत माता की जय... अशी घोषणाबाजी करत जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा यावेळी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी आणि तरुण कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कष्टकरी आणि सामान्य घरातील विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. जोपर्यंत दोषींवर कडक कारवाई होत नाही आणि शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा येत नाही, तोपर्यंत आमचा हा लढा थांबणार नाही, असा इशारा यावेळी विद्यार्थी नेत्यांनी मंचावर दिला.

आंदोलनादरम्यान भारतीय ध्वज हातात घेत अनेक युवक ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत होते. संविधानाच्या मूल्यांचे संरक्षण आणि शिक्षणक्षेत्रातील प्रश्नांवर केंद्र सरकारने गंभीर भूमिका घ्यावी, अशी भावना अनेक आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

घोषणांनी दणाणला परिसर

आंदोलनादरम्यान ‘इन्कलाब झिंदाबाद’, ‘भारत माता की जय’, ‘धर्मेंद्र प्रधान... राजीनामा द्या’ अशा घोषणांचा अखंड जयघोष सुरू होता. डफाच्या तालावर घोषणाबाजी, टाळ्यांचा कडकडाट आणि संविधान हातात घेऊन केलेल्या प्रतीकात्मक सहभागामुळे आंदोलनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. पावसाची पर्वा न करता तरुणाईने अखेरपर्यंत उत्साह कायम ठेवत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा नेला.

चिमुकल्यांचाही उत्साह

तिरंगा रॅलीमध्ये मोठ्या संख्येने तरुण-तरुणींसह चिमुकल्यांनी सहभाग घेतला. अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाची तमा न बाळगता आंदोलनकर्त्यांनी हातात भारतीय ध्वज, संविधानाच्या प्रती, भगतसिंग, शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची छायाचित्रे आणि विविध व्यंगात्मक फलक घेऊन शहराच्या मध्यवर्ती भागातून रॅली काढत आपला रोष व्यक्त केला.

शहराच्‍या मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी

शहराच्या मध्यवर्ती भागातून काढण्यात आलेल्या मोर्चामुळे लाल महाल, कसबा पेठ, रास्ता पेठ आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. त्यातच अधूनमधून सुरू असलेल्या पावसामुळे पर्यायी मार्गांवर वाहनांची मोठी गर्दी झाली आणि अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली. विशेष म्हणजे आंदोलनकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यानंतरही काही काळ रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले नाहीत. परिणामी, चारचाकी, दुचाकीचालक, तसेच सार्वजनिक वाहतुकीतील प्रवाशांना दीर्घकाळ अडकून राहावे लागले. अनेक पादचारीही बंदोबस्तामुळे अडकल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. पावसात वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागल्याचे चित्र शहराच्या मध्यवर्ती भागात पाहायला मिळाले.

तहानलेल्या आंदोलनकर्त्यांसाठी पाणी, नारळ पाण्याची व्यवस्था

मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी नागरिक, तसेच आयोजकांच्या वतीने ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची आणि नारळ पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पावसाळी वातावरण आणि दीर्घकाळ चाललेल्या आंदोलनादरम्यान अनेकांनी या सुविधेचा लाभ घेतला.

व्यंगात्मक फलकांनी वेधले लक्ष

मोर्चादरम्यान आंदोलनकर्त्यांनी विविध व्यंगात्मक फलक आणि पोस्टर्सच्या माध्यमातून लक्ष वेधून घेतले. जागतिक राजकीय नेते, तसेच उद्योगपतींशी संबंधित व्यंगात्मक संदर्भ असलेले फलक झळकाविण्यात आले. यासोबतच हिंदी आणि मराठी चित्रपटांतील गाजलेल्या संवादांचा वापर करून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. संबंधित कलाकारांच्या पोस्टर्ससह हे फलक आंदोलनाचे प्रमुख आकर्षण ठरले.

जेन-झींकडून पुणे पोलिसांना सलाम!

दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांकडून झालेल्या लाठीमाराच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी आंदोलन संयमाने आणि शांततेत हाताळल्याबद्दल जेन-झी आंदोलनकर्त्यांनी त्यांचे जाहीरपणे कौतुक केले. मोर्चासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देत कोणताही अनुचित प्रकार घडू न देता पोलिसांनी केलेल्या नियोजनाबद्दल आंदोलकांनी आभार मानले. "पुणे पोलिस दिल्ली पोलिसांसारखे नाहीत," असे म्हणत त्यांनी पुणे पोलिसांच्या संयमी भूमिकेचे विशेष कौतुक केले.

शिकण्यासाठीच संघर्ष करण्याची वेळ

आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' असा संदेश दिला; मात्र आज विद्यार्थ्यांना शिक्षण मिळवण्यासाठीच संघर्ष करावा लागत आहे, अशी भावना व्यक्त करण्यात आली. सामान्य विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत असून, हा जनतेचा आक्रोश असल्याचे आंदोलकांनी सांगितले. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राहुल सावंत म्हणाले, की नीट परीक्षा ही केवळ ठिणगी आहे. गेल्या १० ते १२ वर्षांत १५० हून अधिक पेपरफुटी झाल्या असून, त्यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षासाठी नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आंदोलन करीत आहोत. शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा.ओंकार ढोबळे म्हणाले, की ही विद्यार्थ्यांची मोठी चळवळ आहे. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागत असताना दिल्लीत विद्यार्थिनींवर लाठीचार्ज केला जात आहे. आम्ही 'जेन झी' आहोत; शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावाच लागेल. फिरोज पंडोलसिंग यांनी 'जेन झी'ने आम्हाला जागे केले,' असे सांगितले. तर नितीन आंधळे यांनी 'सरकारला विद्यार्थ्यांच्या स्वप्नांपेक्षा इतर गोष्टींना अधिक महत्त्व आहे,' अशी टीका केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT