पुणे: महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या तसेच पूर्वीपासून महापालिकेच्या हद्दीत असलेल्या काही गावांमध्ये स्मशानभूमीत गॅसदाहिनी उभारण्यास ग््राामस्थांकडून विरोध होत आहे. त्यामुळे दोन ठिकाणी आवश्यक साहित्य उपलब्ध होऊनही गॅसदाहिनी प्रत्यक्षात उभारण्याचे काम रखडले आहे.
महापालिकेत गावांचा समावेश झाल्यानंतर या भागांत मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले असून, अनेक निवासी इमारती उभ्या राहिल्या आहेत. मात्र, संबंधित भागांतील स्मशानभूमींमध्ये आधुनिक दहन सुविधा नसल्याने नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी पार्थिव पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत आणावे लागत आहे.
यामुळे येथील स्मशानभूमीवरील ताण सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत सध्या 29 स्मशानभूमी असून, त्यामध्ये 27 गॅसदाहिन्या कार्यरत आहेत. तरीदेखील शहरातील 60 टक्के अंत्यसंस्कार वैकुंठ स्मशानभूमीतच होत आहेत. त्यामुळे अंत्यसंस्कार व्यवस्थेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी उपनगर आणि समाविष्ट गावांमधील स्मशानभूमीत आधुनिक सुविधा उभारण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्याअंतर्गत विद्युतदाहिनी किंवा गॅसदाहिनी बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
उत्तमनगर, खडकवासला, येवलेवाडी या नव्याने समाविष्ट गावांसह कर्वेनगर परिसरातील स्मशानभूमीत गॅसदाहिनी उभारण्याचा प्रस्ताव होता. या ठिकाणी सध्या पारंपरिक लाकडी चितेवर अंत्यसंस्कार केले जातात. संबंधित स्मशानभूमींमध्ये पुरेशी जागा उपलब्ध असल्याने पारंपरिक पद्धत कायम ठेवूनच केंद्रीय अनुदानातून गॅसदाहिनी बसविण्याचे नियोजन करण्यात आले होते.
त्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबवून प्रत्येकी एका गॅसदाहिनीसाठी 65 लाख रुपये आणि चिमणीसाठी 15 लाखांची निविदा मंजूर केली आहे. आवश्यक साहित्यही महापालिकेकडे उपलब्ध झाले असून, केवळ यंत्रणा बसवण्याचे काम बाकी आहे. मात्र, स्थानिकांचा विरोध कायम असल्याने हे काम पुढे सरकू शकलेले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, या गावांमध्ये पूर्वापार लाकडी चितेवरच अंत्यसंस्कार करण्याची परंपरा आहे. महापालिकेत समावेश झाल्यानंतरही परंपरा कायम ठेवावी, अशी ग््राामस्थांची भूमिका आहे.
काही गावांमधून गॅसदाहिनी बसवण्याची मागणी
दुसरीकडे, काही गावांमधून मात्र स्मशानभूमीत गॅसदाहिनी बसविण्याची मागणी केली जात आहे. शिवणे, रामटेकडी, नांदेड आणि मांजरी परिसरात गॅसदाहिनीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सातत्याने प्रशासनाकडे होत आहे. पुढील टप्प्यात केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर या भागांतही गॅसदाहिन्या उभारण्याचे नियोजन असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
गॅसदाहिनीत अंत्यसंस्कारासाठी जनजागृती करणार
महापालिकेच्या विद्युत विभागाच्या मुख्य अभियंता मनीषा शेकटकर यांनी सांगितले की, काही गावांमध्ये गॅसदाहिनी उभारण्यास विरोध होत असला तरी पारंपरिक दहनपद्धती बंद केली जाणार नाही. कोणत्या पद्धतीने अंत्यसंस्कार करायचे, हा निर्णय संबंधित कुटुंबीयांचा असेल. गॅसदाहिनीत अंत्यसंस्कार मोफत होत असल्याने नागरिकांनी या सुविधेचा स्वीकार करावा, यासाठी जनजागृतीचे प्रयत्न सुरू आहेत.