Pune Ganpati Visarjan 2025
पुणे : पुण्यातील विसर्जन मिरवणुक शनिवारी (दि. 6) एक तास अगोदर सुरू होणार असून यंदाही मिरवणुक वेळेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी काटेकोरपणे पावले उचलण्यात आली आहे. त्याला मानाच्या मंडळांसह इतर प्रमुख मंडळांनी सहकार्य करण्याची सहमती दर्शवली आहे. मागील वर्षी सकाळी साडेदहा वाजता सुरू ही मिरवणूक सुरू झाली होती. यंदा सकाळी साडेनऊ वाजता ही विसर्जन मिरवणुक सुरू होणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी सह पोलीस आयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, राजेश बनसोडे, मनोज पाटील, उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, निखील पिंगळे आदी उपस्थित होते.
शनिवारी (दि.6) सकाळी 9.30 वाजता मानाचा पहिला कसबा गणपती टिळक पुतळा, मंडई येथे आगमन करेल. 9.30 वाजता पूजा संपवून कसबा गणपती मिरवणुकीस प्रारंभ करून तो बेलबाग चौकात पोहोचेल. 10.15 वाजता तेथून पुढे लक्ष्मी रोडवर मार्गस्थ होईल. यानंतर ठरलेल्या वेळापत्रकानुसार मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती सकाळी 10.30 वाजता बेलबाग चौकातून पुढे जाईल. मानाचा तिसरा गुरुजी तालिम गणपती गुलाल व आरती करून 11 वाजता मार्गस्थ होईल. मानाचा चौथा तुळशीबाग गणपती व मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती दुपारी 12 वाजेपर्यंत बेलबाग चौकातून पुढे जातील, अशा प्रकारे सर्व मानाचे पाचही गणपती दुपारी 12 वाजेपर्यंत लक्ष्मी रोडवर मार्गस्थ होतील, असे नियोजन पोलिसांनी केले आहे.
यानंतर दुपारी 1 वाजेपर्यंत महानगरपालिका गणपती व त्वेष्टा कासार गणपती मिरवणुकीत सामील होतील. दुपारी 4 वाजता श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती बेलबाग चौकात येऊन मुख्य मिरवणुकीत सहभागी होईल. त्यानंतर संध्याकाळी 5.30 वाजता जिलब्या मारुती गणपती, हुतात्मा बाबू गेनू गणपती, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती व अखिल मंडई मंडळ गणपती प्रवेश करतील. ही मंडळे रात्री 7 वाजेपर्यंत बेलबाग चौक सोडतील.
विद्युत रोषणाई असलेली मंडळे रात्री 7 नंतर मिरवणुकीत सामील होतील. लक्ष्मी रोड व शिवाजी रोडवरून येणारी सर्व मंडळे फक्त बेलबाग चौकातूनच मुख्य मिरवणुकीत प्रवेश करतील. मानाचा पहीला कसबा गणपती अलका टॉकीज चौक पार करेपर्यंत इतर कोणतेही मंडळ त्या चौकात प्रवेश करणार नाही, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.
पोलिसांनी सर्वानुमते विसर्जन मिरवणूकीसाठी आराखडाच तयार केला आहे. त्याला मानाच्या मंडळांसह प्रमुख गणेश मंडळांनी संमती दर्शविली असून वेळ पाळण्याची हमी दिली आहे. त्यामुळे यंदा विसर्जन मिरवणूक वेळेत पार पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
टिळक पुतळा, मंडई ते बेलबाग चौक दरम्यान वाद्यवृंद वादनास मनाई. वादनाची सुरुवात बेलबाग चौकापासूनच.
-मुख्य मिरवणुकीत दोन मंडळांमध्ये अंतर राहणार नाही, कोणीही रांग सोडून प्रवेश करणार नाही.
- अलका टॉकीज चौक पार केल्यानंतर ढोल-ताशा पथक सदस्यांनी परतीचा मार्ग मिरवणुकीच्या उलट दिशेने घेऊ नये.
- कोणतेही ढोल-ताशा पथक स्थिर वादन करणार नाही.
- प्रत्येक मंडळास जास्तीत जास्त 2 ढोल-ताशा पथकांचीच परवानगी, एका पथकात 60 सदस्य.
- डीजे किंवा ढोल-ताशा पथक - पैकी फक्त एकच मंडळासोबत असेल.
विसर्जन मिरवणुकीत वेळ पाळली जावी आणि विसर्जन सुरळीत पार पडावे, यासाठी काटेकोर तयारी केली आहे. मानाचे मंडळांसह इतर मंडळांनी देखील वेळ पाळण्याची ग्वाही दिल्याने यंदा विसर्जन मिरवणूक अधिक शिस्तबद्ध पार पडेल असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
लोहगाव विमानतळ येथे रात्री वेगवेगळ्या एअर लाइन्सची व भारतीय वायु सेनेची विमाने हेलिकॉप्टर, उतरत असतात व उड्डाण करीत असताना रात्रीच्या वेळी त्यांना लेझर लाईटचा अडथळा निर्माण होतो. विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईट प्रकाशीत होत असतात याही वर्षी या लेझर लाईटला करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या लेझर लाईटमुळे नागरिकांच्या डोळ्याला त्रास झाल्याच्या घटना समोर आल्यानंतर गेल्यावर्षी लेझर लाईटींग वापरावर मंडळांना बंदी घालण्यात आली होती. यावर्षीही ही बंदी कायम राहणार आहे.