

मुंबई : सहा फुटांखालील गणपतींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेने दिले आहेत. त्याप्रमाणे भाविक सहा फुटांखालील घरगुती आणि सार्वजनिक मुर्त्यांचे कृत्रिम तलावांत विसर्जन करत आहेत. मात्र, महापालिकेच्या कृत्रिम तलावांत गणपतीचे विसर्जन करण्यासाठी भाविकांकडून पैशांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी दीड दिवसांच्या गणपती विसर्जनापासूनच यायला सुरुवात झाली होती. परंतु, मंगळवारी गौरी गणपती विसर्जनाच्या दिवशी गिरगाव चौपाटीवर याचा प्रत्यक्ष अनुभव काही गणेशभक्तांना आला.
मुंबई महापालिकेने गिरगाव चौपाटीवर सहा फुटांखालील गणपतीच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उभारले आहेत. याठिकाणी महापालिकेने तैनात केलेल्या जीवरक्षकांकडून गणेश भाविकांकडे विसर्जनासाठी पैशांची मागणी केली जात आहे. व्यक्ती आणि त्याचे हावभाव पाहून अवाजवी मागणी केली जात असल्यामुळे भाविकांनी याबाबत तक्रारी केल्या. पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांसमोरच पैशांची मागणी केले जात असल्यामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याठिकाणी भाविकांकडून पैसे घेतानाचे काही फोटो-व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे हा प्रकार समोर आला आहे.