Pune Gang War Pudhari Photo
पुणे

Pune Gang War: पुण्यात टोळीयुद्धाचा स्फोट; आंदेकर-गायकवाड गटात पुन्हा रक्तरंजित संघर्ष

तुरुंगातूनही आदेश सुरू असल्याचा आरोप; शहरात भीतीचे वातावरण, पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

पुणे: माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाने सुरू झालेला रक्तरंजित खेळ काही केल्या थांबण्याचे नाव घेताना दिसून येत नाही. कुख्यात बंडू आंदेकर टोळी आणि सोमनाथ गायकवाड टोळीतील वाद एकमेकांचे मुडदे पाडतोय. निखिल आखाडेच्या खुनाने ही ठिणगी पडली. मात्र, आंदेकर टोळी असो, की सोम्या गायकवाड यांचे नंबरकारी सध्या तुरुंगात आहेत. असे असले तरी आयुष कोमकर, गणेश काळे या दोघांचे खून आणि आता अक्षय मस्केवरील खुनी हल्ला पाहता आंदेकर टोळी कारागृहातून सक्रिय असल्याचे स्पष्ट होत आहे.

टोळीयुद्धाचा संघर्ष आता थेट ‌‘मर्डर मिशन‌’मध्ये बदलला असून, या रक्तरंजित खेळाचा ‌‘रिमोट कंट्रोल‌’ कारागृहातून ऑपरेट होत आहे. सोमनाथ गायकवाड टोळीशी संबंधित आकाश मस्केचा भाऊ अक्षय मस्के याच्यावर बुधवारी झालेल्या जीवघेणाा हल्ल्याने पुन्हा एकदा पुण्यातील टोळीयुद्ध पेटल्याचे स्पष्ट झाले आहे. गुंड जेलमध्ये, पण आदेश बाहेर आणि शहरात थेट ‌‘खून का बदला खून‌’चा खेळ सुरू आहे. आंदेकर टोळीचा गुन्हेगारी इतिहास चार दशकांहून जुना आहे. मटका, खंडणी, गावठी दारू, जमीन व्यवहार आणि राजकीय पाठबळाच्या जोरावर उभी राहिलेली ही टोळी आता थेट शहरातील गँगवॉरचे केंद्र बनली आहे. बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, शिवम आंदेकर या नावांनी वर्षानुवर्षे पुण्यात दहशत निर्माण केली.

जुने संघर्ष मागे पडले; पण कोमकर-गायकवाड गटाशी सुरू झालेल्या नव्या युद्धाने शहर हादरले आहे. या रक्तरंजित संघर्षाचा स्फोट सप्टेंबर 2024 मध्ये वनराज आंदेकर यांच्या भररस्त्यात झालेल्या निर्घृण खुनानंतर झाला. त्यानंतर पुण्याच्या गुन्हेगारी जगतात ‌‘बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही‌’ अशी उघड चर्चा सुरू झाली. त्यानंतर सुडाचे सत्र सुरू झाले. वनराज आंदेकरच्या बहिणीचा पती गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर याचा खून झाला. त्यानंतर समीर काळेचा भाऊ गणेश काळेची कोंढव्यात गोळ्या झाडून, धारदार कोयत्याने वार करून खून करण्यात आला.

त्यातच आता सोमनाथ गायकवाडच्या टोळीतील ज्याने पिस्तुलाची तस्करी केली बोलले जात होते त्या आकाशच्या भावाचा बुधवारी डेथगेम करण्याचा प्लॅन झाला. परंतु त्यातून तो बचावला. टोळीयुद्धामुळे यातील बऱ्यापैकी मुख्य आरोपी कारागृहात असल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचणे व त्यांचा बदला अवघड झाल्यानंतर आता थेट नातेवाईकांना लक्ष्य केले जात असल्याने टोळीयुद्ध अधिक क्रूर बनले आहे.

पोलिसांकडून ‌‘टोळी मोडून काढू‌’ची पोकळ घोषणा

‌‘विरोधकाचा माणूस जिवंत राहता कामा नये‌’ असा संदेशच या हल्ल्यांतून दिला जात आहे. तडीपारी, अटकसत्र, विशेष पथके पोलिसांनी सर्व उपाय केले; पण शहरातील रक्तपात थांबलेला नाही. प्रत्येक खुनानंतर ‌‘टोळी मोडून काढू‌’ अशी घोषणा होते आणि काही दिवसांत पुन्हा गोळ्या झाडल्या जातात. त्यामुळे पुणे पोलिसांचे गुप्तचर जाळे नेमके कुठे अपयशी ठरत आहे, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

पुढचा नंबर कोणाचा?, पुन्हा मोठ्या रक्तपाताची भीती

अक्षय मस्केवरील हल्ल्यानंतर शहरात पुन्हा मोठ्या रक्तपाताची भीती व्यक्त होत आहे. पुणे पुन्हा एकदा गँगवॉरच्या उंबरठ्यावर उभे ठाकले असून, ‌‘पुढचा नंबर कोणाचा?‌’ या भीतीने गुन्हेगारी वर्तुळासह सामान्य नागरिकांच्याही काळजाचा ठोका चुकू लागला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT