पुणे: गणेशोत्सवासाठी महापालिकेने दोन कमानी उभारण्याची परवानगी दिलेली असताना शहराच्या विविध भागांत मात्र अनधिकृत कमानी आणि ‘रनिंग मंडप’चा सुळसुळाट सुरू आहे. अनेक ठिकाणी परवानगीपेक्षा अधिक कमानी उभारल्या जात असून, काही ठिकाणी गणेश मंडळाच्या मंडपापासून दूर तसेच वाहतुकीच्या मार्गावर कमानी उभारण्यात आल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्वागताच्या नावाखाली महापालिकेच्या नियमांची सर्रास पायमल्ली होत असून, वाहतूक कोंडीसह आपत्कालीन सेवांनाही अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.
अटींचे पालन मंडळांसाठी बंधनकारक
गणेशोत्सवासाठी पुण्यात देश-विदेशासह महाराष्ट्राच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक येतात. या भाविकांच्या स्वागतासाठी गणेश मंडळांकडून कमानी उभारल्या जातात. महापालिकेने त्यासाठी नियम आणि अटी निश्चित केल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात या नियमांना हरताळ फासला जात असल्याचे शहरातील विविध भागांत दिसून येत आहे. महापालिकेच्या नियमानुसार कमान किंवा मंडप उभारताना आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि पोलिसांची वाहने सहजपणे जाऊ शकतील, एवढी जागा मोकळी ठेवणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर पादचारी तसेच वाहनांच्या वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना मंडळांना देण्यात आल्या आहेत. रस्त्यावरील वाहतुकीसंदर्भातील सूचना देणारे फलक, चिन्हे किंवा सिग्नल झाकले जाणार नाहीत, याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. महापालिकेने घालून दिलेल्या या अटींचे पालन करणे मंडळांसाठी बंधनकारक आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात शहरात कमानी उभरल्याने वाहतुकीला मोठा आढथळा होण्याची शक्यता आहे.
नियम कागदावर; अंमलबजावणी कुठे?
शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि गर्दीच्या परिसरात सध्या कमानी उभारण्याचे काम सुरू आहे. दोन कमानींची परवानगी असताना काही ठिकाणी त्यापेक्षा अधिक कमानी उभारल्या जात आहेत. काही भागांत मंडपापासून दूर, तर काही ठिकाणी थेट वाहतुकीच्या मार्गावर किंवा गर्दीच्या ठिकाणी कमानी उभारण्यात आल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सव हा पुण्याच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. मंडळांच्या उत्साहाला कोणताही धक्का न लावता उत्सव साजरा होणे आवश्यक आहे. मात्र, त्याचवेळी महापालिकेने घालून दिलेल्या नियमांचे पालन होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे शहरातील अनधिकृत कमानी आणि 'रनिंग मंडपां'वर महापालिका प्रशासन नेमकी कोणती कारवाई करणार, याकडे आता पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
कमान मंडपापासून १०० मीटरच्या आतच हवी
महापालिकेच्या नियमानुसार गणेश मंडळाला दोन कमानी उभारण्याचीच मुभा आहे. तसेच संबंधित कमान गणेश मंडळाच्या मंडपापासून १०० मीटरच्या आत असणे आवश्यक आहे. महापालिकेची अंतिम परवानगी मिळण्यापूर्वी 'रनिंग मंडप' अथवा कमान उभारता येत नाही. नियमबाह्य पद्धतीने कमान अथवा मंडप उभारल्यास संबंधित मंडळाची ना-हरकत रद्द करण्याची तरतूद आहे. तसेच अनधिकृतपणे उभारलेली कमान किंवा मंडप तातडीने हटवून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.
महापालिकेचे महत्त्वाचे नियम
गणेश मंडळांना दोनच कमानी उभारण्याची परवानगी
कमान मंडपापासून १०० मीटरच्या आत असणे आवश्यक
अग्निशमन दल, रुग्णवाहिका व पोलिसांच्या वाहनांसाठी
जागा मोकळी ठेवणे बंधनकारक
पादचारी व वाहतुकीला अडथळा निर्माण करता येणार नाही
वाहतूक फलक, चिन्हे आणि सिग्नल झाकता येणार नाहीत
अंतिम परवानगीपूर्वी कमान अथवा ‘रनिंग मंडप’ उभारता येणार नाहीत
नियमभंग झाल्यास ना-हरकत रद्द करण्याची तरतूद
अनधिकृत कमान, मंडप हटवून कायदेशीर कारवाईची तरतूद
मंडप परवान्यांची स्थिती
महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांनी २०१९ ते २०२५ मध्ये २०१३ मंडप परवाने दिले. त्यामध्ये १७२६ ऑनलाइन, तर १७० ऑफलाइन परवान्यांचा समावेश होता. २०२२ ते १७० परवाने ऑफलाइन पद्धतीने देण्यात आले आहे.
गणेशोत्सवात मंडप किंवा स्वागत कमानी उभारण्यासाठी पालिकेची सरसकट परवानगी दिलेली नाही. मंडप, स्वागत मंडप आणि कमानींसाठी पोलिसांची 'ना हरकत' आवश्यक असून, ती प्राप्त झाल्यानंतरच संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडून परवानगी दिली जाते. शहरातील परवानग्यांची एकत्रित माहिती सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडून मागविण्यात येईल.सोमनाथ बनकर, अतिक्रमण विभागप्रमुख, महापालिका