पुणे: गणेशोत्सवात गणरायाचे दर्शन आणि देखावे पाहण्यासाठी पुणेकरांची गर्दी होत असतानाच या गर्दीत ‘ऐका हो ऐका...’चा आवाज घुमतो आणि काही क्षणांत नागरिकांचे लक्ष कलाकारांच्या पथनाट्याकडे वेधले जाते. सध्या उत्सवात ठिकठिकाणी विविध कला पथक आणि संस्थांमधील कलाकार पथनाट्य सादर करीत असून, पथनाट्यांतून एचआयव्ही एड्स जनजागृती, वाहतूक नियम, नागरिक शिष्टाचार, स्वच्छता, महिला सुरक्षितता, अशा विविध सामाजिक प्रश्नांवर प्रबोधन केले जात आहे.
गणेशोत्सवातील उत्सवी वातावरणाला समाजप्रबोधनाची जोड देत शहराच्या मध्यवर्ती भागांपासून उपनगरांपर्यंत विविध संस्था आणि कलापथकांनी पथनाट्यांचा जागर सुरू केला आहे. कलाकारांच्या प्रभावी अभिनयातून मांडले जाणारे विषय नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. सायंकाळच्या गर्दीत सादर होणाऱ्या या पथनाट्यांना पुणेकरांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गणेशोत्सवात मंडळांकडून जिवंत देखावे सादर केले जात आहेतच.
त्याच धर्तीवर काही संस्था आणि कला पथकांकडून सामाजिक संदेश देणारी पथनाट्ये सादर केली जात आहेत. उत्सवाच्या पहिल्या दिवसापासून शहरातील विविध भागांत कलाकार गर्दीत मिसळून पथनाट्य सादर करीत आहेत. सायंकाळी सहानंतर मंडळांचे देखावे पाहण्यासाठी जमलेल्या नागरिकांसमोर हे प्रयोग होत असून, रात्री दहापर्यंत विविध ठिकाणी त्यांचे सादरीकरण सुरू असते.
पुणे महापालिकेच्या पुणे शहर एड्स नियंत्रण संस्थेच्या माध्यमातून गणेशोत्सवात एचआयव्ही एड्सविषयी जनजागृती केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून जनजागृती कला मंचचे कलाकार गर्दीत पथनाट्य सादर करून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करीत आहेत. मंचचे नरेंद्र सावंत म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून मी आणि माझे सहकलाकार गणेशोत्सवात पथनाट्य सादर करीत आहोत. उत्सवात कला सादर करण्याचा आनंद मिळतोच; पण त्याचबरोबर एखाद्या ज्वलंत विषयावर नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची संधीही मिळते. पथनाट्य हे समाजजागृतीचे प्रभावी माध्यम आहे.
पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती
दरवर्षीप्रमाणे यंदाही स्व-रूपवर्धिनीच्या वतीने गणेशोत्सवात पथनाट्यांचे सादरीकरण केले जात आहे. 'नागरिक शिष्टाचार' या विषयावरील पथनाट्यातून सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे, वाहतुकीचे नियम पाळणे, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे, ज्येष्ठ नागरिकांचा आदर करणे आणि जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडणे, याबाबत संदेश दिला जात आहे. यासोबतच अन्नसुरक्षा आणि अन्नभेसळीच्या विषयावरही पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. अन्नाची नासाडी टाळणे, भेसळयुक्त अन्नाबाबत सजग राहणे तसेच सुरक्षित आणि सकस आहाराचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले जात आहे. मध्यवर्ती पेठांसह धनकवडी, पद्मावती, वारजे-कर्वेनगर, धायरी, कोथरूड आणि पांडवनगर, या भागांत विविध गटांकडून पथनाट्यांचे सादरीकरण सुरू असून, पथनाट्याला पुणेकरांचा प्रतिसाद मिळत आहे.