Ganeshotsav Pudhari
पुणे

Pune Ganeshotsav Social Media: एका क्लिकवर बाप्पाचे दर्शन; पुण्याचा गणेशोत्सव सोशल मीडियामुळे ‘ग्लोबल’

रील्स, व्हिडीओ, एआय आणि लाइव्ह स्ट्रीमिंगचा वापर; मंडळांकडून सोशल मीडियासाठी स्वतंत्र टीम

पुढारी वृत्तसेवा

सुवर्णा चव्‍हाण

पुणे: ढोल-ताशांचा गजर, विद्युत रोषणाईने उजळलेले रस्ते, आकर्षक देखावे, बाप्पाची आरती अन्‌ मंडळांमध्ये रंगणारे सांस्कृतिक कार्यक्रम... गणेशोत्सवाचा हा उत्साह आता केवळ पुण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. उत्‍सव जगभर पोहोचला आहे. पुणे शहरासह उपनगरातील मंडळेही तंत्रस्नेही झाली असून, बाप्पाचे दर्शन अन्‌ देखाव्यांची झलक रील्स, व्हिडीओ, छायाचित्रे आणि थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून काही क्षणांत जगभरातील गणेशभक्तांपर्यंत पोहचत आहेत. विशेष म्हणजे, काही मंडळांकडून रील्ससाठी एआय वापरले जात आहे. एका क्लिकवर बाप्पाचे दर्शन...एका रीलमध्ये देखाव्याची झलक...तर इन्स्टाग्राम, फेसबुक, यू-ट्यूबवरील थेट प्रक्षेपणाद्वारे उत्सवाचा अनुभव! मंडळांचा गणेशोत्सवही आता ग्लोबल बनला आहे.

गणेशोत्सवात मंडळांच्या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी आणि देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत असतानाच, सोशल मीडियावरही उत्सवाचा रंग अनुभवायला मिळत आहे. मध्यवर्ती पेठांमधीलच नव्हे, तर उपनगरातील आणि ग्रामीण भागातील मंडळेही सोशल मीडियाचा वापर करत आहेत. सध्या सर्वाधिक चर्चेत मंडळांच्या बाप्पांचे आणि देखाव्यांचे रील्स आहेत. गजाननापासून ते देवा श्रीगणेशापर्यंत अशा विविध गीतांवर बनवलेल्या रील्स पसंतीस उतरत आहेत.

तर एआयच्या साहाय्याने तयार केलेले रील्सही गाजत आहेत. पुण्याबाहेर, देशाच्या विविध भागांत किंवा परदेशात राहणाऱ्या गणेशभक्तांना मंडळांचे देखावे, बाप्पाची मूर्ती, आरती आणि विविध उपक्रमांची झलक मोबाईलच्या एका क्लिकवर पाहता येत आहे. यंदा अनेक मंडळांनी सोशल मीडियासाठी स्वतंत्र टीम तयार केली आहे. व्हिडीओग्राफर, छायाचित्रकार आणि रील्स तयार करणारे कार्यकर्ते उत्सवातील प्रत्येक महत्त्वाचा क्षण कॅमेराबद्ध करत आहेत. सकाळच्या आरतीपासून रात्रीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांपर्यंतचे अपडेट्स सोशल मीडिया व्यासपीठावर सातत्याने पोस्ट केले जात आहेत. काही मंडळांनी तर व्हॉट्सॲप ग्रुपही तयार केले आहेत.

मंडळातील अनुभवी आणि नवे कार्यकर्ते मिळून सोशल मीडियाद्वारे मंडळाचा गणेशोत्सव भक्तांपर्यंत पोहोचवत आहेत. बुधवार पेठेतील गवळी आळी येथील होनाजी तरुण मंडळ ट्रस्टचे राहुल आलमखाने म्हणाले, गणेशोत्सवातील उपक्रम आणि देखाव्याची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत आहोत. त्यासाठी तीन जणांची स्वतंत्र सोशल मीडिया टीम तयार केली आहे. यामध्ये व्हिडीओग्राफर, छायाचित्रकार आणि रील्स तयार करणाऱ्या सदस्यांचा समावेश आहे. रोज दोन ते तीन पोस्ट आणि रील्स शेअर केल्या जात आहेत. मंडळात येणारे सेलिब्रिटी, त्यांच्या हस्ते होणारी श्रीगणेशाची आरती, विविध कार्यक्रम तसेच विशेष क्षणांचे रील्स तयार करून ते सोशल मीडियावर प्रसिद्ध केले जात असून, जगभरातील श्रीगणेशभक्त या माध्यमातून जोडले जात आहेत.

‘बाप्पाचरणी एक वही, एक पेन’ या सामाजिक उपक्रमासाठी आम्ही सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करीत आहोत आणि उपक्रमावरील व्हिडीओ पाहून अनेक जणांनी गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. तसेच, आम्ही मंडळांचा गणेशोत्सव सोशल मीडियाद्वारे जगभरातील भक्तांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. मंडळातील चार कार्यकर्त्यांची टीम रोजचे अपडेट्स, रील्स आणि उपक्रमांची माहिती सोशल मीडियावरून प्रसारित करीत आहे.
अनिकेत मुंदडा, उत्सवप्रमुख, नवग्रह मित्रमंडळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT