Pune Ganeshotsav Science Exhibitions Pudhari
पुणे

Pune Ganeshotsav Science Exhibitions: मध्य पुण्याच्या गर्दीला पर्याय; उपनगरांत गणेशोत्सवाचे ‘सायन्स’ देखावे ठरतात आकर्षण

शिवराज मंडळाचे फिरते तारांगण, नवज्योत मित्रमंडळाचा बोलका रोबो; विज्ञान-तंत्रज्ञानाची विद्यार्थ्यांना मेजवानी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुण्याच्या गणेशोत्सवात गर्दी उसळते ती मध्य पुण्यातल्या एक ते दीड किलोमीटर व्यासाच्या वर्तुळात. अनेक नामवंत मंडळांचे दर्जेदार देखावे याच भागात आहेत. या वर्तुळाबाहेर गर्दीचे वलय विरत जाते. उपनगरांच्या देखाव्यांना तर केवळ त्याच भागातले नागरिक भेट देतात.

तुलनेने या वर्तुळाबाहेरच्या मंडळांना प्रतिसाद कमी असला तरी मध्य पुण्यातल्या देखाव्यांना मागे सारतील, अशा दर्जाचे देखावे काही मंडळांतील कार्यकर्ते अनेक वर्षे निष्ठेने करत आले आहेत. कमी गर्दी होणाऱ्या पूर्व पुण्यातल्या शिवराज मंडळाने नासामधून प्रशिक्षण घेतलेल्या अंतराळशास्त्रज्ञ बोकील यांच्या मार्गदर्शनाखाली आणलेले बंगलोरचे फिरते तारांगण असो वा येरवड्यासारख्या झोपडपट्टीवजा चाळीत राहणाऱ्या आणि डीआरडीओ या केंद्रीय संशोधन संस्थेत काम करणाऱ्या अमित जाधव या तरुणाने चक्क प्रेक्षकांशी बोलणाऱ्या रोबोला सादर केले आहे.

पूर्व पुण्यातल्या शिवराज मंडळ हे दरवर्षी सामाजिक देखावे सादर करून समाज प्रबोधनाचे काम करते. एका पु्स्तक प्रकाशनाच्या निमित्ताने मंडळाचे अध्यक्ष किरण सोनीवाल यांची गाठ पडली ती अंतराळशास्त्रज्ञ लिना बोकील यांची. मूळ बेळगावच्या असलेल्या बोकील यांनी इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशनची पदवी घेतल्यानंतर त्यांचा संपर्क भारतीय अंतराळ विकास संस्था-इस्त्रो, आयआयटी बंगलोर या संस्थांशी आला. तिथून त्या थेट अमेरिकेतल्या नासाशी स्पेस एज्युकेशन प्रोग्रँमशी जोडल्या गेल्या. त्यातून आतापर्यंत त्यांनी नासाच्या केलेल्या सात वाऱ्यांमध्ये त्यांची भेट प्रथम चांद्रवीर आर्मस्ट्राँग, एडविन आल्ड्रिन यांच्यापासून ते भारतीय वंशाचे अंतराळवीर राकेश शर्मा यांच्यापर्यंत झाली. अंतराळशास्त्राचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देत असतानाच त्यांचा संपर्क इस्त्रोशी जोडण्यात आलेल्या तारे जमी पर या बंगलोरस्थित कंपनीशी झाला. त्या कंपनीचे फिरते तारांगण पुण्याच्या शिवराज मंडळाने गणेशोत्सवात सादर करावे, असे त्यांनी सोनीवालना सुचवले आणि त्यातूनच हा देखावा साकारण्यात आला आहे.

शिवराज मंडळाच्या या फिरत्या तारांगणात आकाशगंगा, चांद्रमोहीम, विश्वाची उत्पत्ती करणारा महास्फोट आदी सात विषयांवरील चित्रपट आहेत. एका फुगवलेल्या फुग्यामधील पोकळ जागेत प्रेक्षकांनी बसायचे आणि गोलाकार फुग्याच्या पडद्यावर अंतराळातील कथा पाहायची, अशी ही संकल्पना असून, अत्याधुनिक प्रोजेक्टरमुळे देखावा विलक्षण सुंदर झाला आहे. पुढारीशी बोलताना बोकील म्हणाल्या की, मला एक विशेष स्पेस सेंटर उभे करायचे असून, अंतराळविषयक अभ्यासक्रम सुरू करायचे आहेत. शिवराज मंडळाच्या देखाव्यांना मध्य पुण्याएवढी नसली तरी बऱ्यापैकी गर्दी होते, पण येरवड्यासारख्या उपनगरामध्ये मंडळांना मिळणारा प्रतिसाद फारच कमी असतो. तरीही प्रतिसादाची तमा न बाळगता निष्ठेने अत्यंत सुंदर देखावे सादर करण्याची परंपरा ज्या मोजक्या मंडळांनी जपली आहे.

त्यात नवज्योत मित्रमंडळाचा समावेश होतो. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था-डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच डीआरडीओ या प्रतिष्ठित केंद्रीय संस्थेत अभियंता म्हणून काम करणाऱ्या अमित जाधव हा तरुण या देखाव्याचा मुख्य कर्ता आहे. प्रेक्षकांशी मराठीत बोलणारा विघ्नेश हा रोबोट, झाडावरची फळे तोडून बादलीत ठेवणारा रोबोटिक हात आणि चक्क थ्रीडी प्रिंटरच्या माध्यमातून साकार होणारी गणेशमूर्तीची थ्रीडी प्रतिमा या तीनही बाबी थक्क करणाऱ्या आहेत. आपल्या देखाव्याचा हेतू केवळ मनोरंजन हा नाही तर विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी आवड निर्माण करणे हा उद्देश आहे, असे पुढारीशी बोलताना अमित जाधव सांगतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT