Pune Ganeshotsav Rules 2026 Pudhari
पुणे

Pune Ganeshotsav Rules: डीजे-लेझरवाल्यांनो सावधान! पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा; नियम मोडल्यास होणार कारवाई

Pune Ganeshotsav Rules 2026: पुणे जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने उत्सव आणि विसर्जन मिरवणुकीसाठी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Rahul Shelke

Pune Ganeshotsav Rules 2026: पुण्यात गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असताना उत्सव आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. डीजे, लाऊडस्पीकर आणि लेझर लाईटच्या वापराबाबत प्रशासनाने नवीन नियम केले आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी गणेश मंडळांनी नियमांचे स्वतःहून पालन करण्याचे आवाहन केले आहे.

ग्रामीण भागात लेझर लाईटवर १०० टक्के बंदी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागासाठी लेझर लाईटच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. यासंदर्भात प्रशासनाने नुकताच आदेश जारी केला आहे. पोलिस विभागाकडून आलेल्या प्रस्तावानंतर हा आदेश काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

लेझर लाईटचा मानवी आरोग्यावर, विशेषतः डोळ्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. लहान मुलांच्या डोळ्यांवरही त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता असल्याने खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

गणेश मंडळांनी स्वतःहून नियम पाळावेत

गणेशोत्सव हा पुण्याचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा उत्सव आहे. त्यामुळे हा उत्सव शिस्तबद्ध आणि आनंदाच्या वातावरणात पार पडावा, यासाठी गणेश मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन डुडी यांनी केले.

“आम्ही काढलेल्या आदेशाचे गणेश मंडळांनी स्वतःहून पालन करावे. नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करण्याची वेळ येऊ नये,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाकडून गणेश मंडळांसोबत सातत्याने बैठका घेतल्या जात असून, नियम आणि अटींबाबत मंडळांना आधीपासूनच सूचना दिल्या जात आहेत.

डीजे आणि लाऊडस्पीकरसाठी ध्वनिपातळीचे नियम

पुण्यात डीजेच्या वापरावरून दरवर्षी वाद निर्माण होतो. यंदाही डीजे, प्लाझ्मा, मिड प्रेशर आणि कर्कश आवाजामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा उपस्थित झाला आहे.

याबाबत बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेल्या ध्वनिपातळीच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.

ध्वनिपातळी निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्यास डीजे किंवा साऊंड सिस्टीमचा वापर करता येणार नाही. या नियमांचे पालन व्हावे यासाठी पोलिस विभागाकडून गणेश मंडळांसोबत बैठका घेतल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

“उत्सव साजरा करा, पण नियमांच्या चौकटीत”

उत्सव झाल्यानंतर मंडळांवर कारवाई करण्याची वेळ प्रशासनावर येऊ नये, यासाठी आधीपासूनच नियमांची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी उत्सवाच्या सुरुवातीपासूनच निर्धारित नियमांचे पालन करावे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

शहराच्या हद्दीत नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिस आयुक्तालयाची असून, ग्रामीण भागात प्रशासनाकडून लेझर लाईटसंदर्भात आदेश जारी करण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

पुण्यात यंदा नियमांची काटेकोर अंमलबजावणी होणार?

गणेशोत्सवाच्या काळात डीजे आणि साऊंडच्या कर्कश आवाजामुळे नागरिकांना होणारा त्रास, तसेच लेझर लाईटमुळे होणारे संभाव्य दुष्परिणाम लक्षात घेता प्रशासनाने यंदा नियमांच्या अंमलबजावणीवर विशेष भर दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गणेशोत्सवाबाबत आढावा घेतला आहे.

त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात लेझर लाईटवर बंदी आणि डीजे-साऊंडसाठी निर्धारित ध्वनिमर्यादेचे पालन हे प्रशासनाच्या दृष्टीने प्रमुख मुद्दे असणार आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT