Sunetra Pawar Eknath Shinde  Pudhari
पुणे

Pune Ganeshotsav: पुण्यात गणेशदर्शनापासून उपमुख्यमंत्री दूर; कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर

सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदेंनी प्रमुख गणेश मंडळांकडे फिरवली पाठ; मुरलीधर मोहोळांच्या मोजक्याच मंडळांना भेटी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पुण्यातील गणेशोत्सवाकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी यंदा पाठ फिरवल्याचे चित्र आहे. पुण्यात येऊनही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मानाच्या गणपतींसह प्रमुख गणेश मंडळांना भेटी दिल्या नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही यंदा मोजक्याच गणेश मंडळांना भेटी दिल्याचे दिसून आले.

पुण्यातील गणेशोत्सवाचे आकर्षण देशभरातील तसेच परदेशातील गणेशभक्तांना आहे. गणेशोत्सवाच्या काळात राजकीय नेत्यांचीही शहरात उपस्थिती असते. यंदा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, केंद्रीय विमान वाहतूकमंत्री राम मोहन रेड्डी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री, खासदार आणि आमदारांनी प्रमुख गणेश मंडळांना भेटी देऊन दर्शन घेतले. मात्र, पुण्याच्या पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुण्यात येऊनही मानाच्या गणपतींसह प्रमुख मंडळांच्या दर्शनाला गेल्या नसल्याचे दिसून आले. त्या पुणे फेस्टिव्हलच्या एका कार्यक्रमालाही उपस्थित होत्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरचा हा पहिलाच गणेशोत्सव असल्याने अनेक गणेश मंडळांनी स्व. अजितदादांच्या जीवनचरित्रावर आधारित देखावे साकारले आहेत. हे देखावे पाहण्यासाठी सुनेत्रा पवार किंवा खासदार पार्थ पवार यांनी मंडळांना भेट द्यावी, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत होती. मात्र, मुंबईतील लालबागच्या गणपतीचे दर्शन घेणाऱ्या पवार यांनी पुण्यातील गणेशोत्सवातील प्रमुख मंडळांना भेटी दिल्या नसल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. विशेष म्हणजे, अजित पवार हे मानाच्या गणपतींसह प्रमुख मंडळांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मंडळांना आवर्जून भेट देत असत. त्यामुळे ही पोकळी अधिक जाणवली. याउलट खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी पहिल्याच आठवड्यात मानाच्या गणपतींसह प्रमुख मंडळांना भेटी दिल्या.

शिंदेंची पुण्यात उपस्थिती; मात्र मंडळांकडे पाठ

शिवसेनेचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पुण्यात येऊन गणपती दर्शन घेतले नाही. गुरुवारी मराठवाड्याच्या दुष्काळी दौऱ्यानंतर सायंकाळी ते पुण्यात आले. विमानतळावरून हेलिकॉप्टरने ते थेट सिंहगड परिसरातील अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरच्या गणपती दर्शनासाठी गेले. त्यानंतर ते मुंबईला रवाना झाले. त्यामुळे पुण्यातील शिवसैनिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

मोहोळांच्या मोजक्याच मंडळांना भेटी

पुण्याचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही यंदा मोजक्याच गणेश मंडळांना भेटी दिल्या. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत त्यांनी मानाचा पहिला कसबा गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि भाजप शहराध्यक्षांच्या हिंदू गर्जना गणपती मंडळाला भेट दिली. मात्र, मानाच्या उर्वरित चार गणपतींसह प्रमुख मंडळे आणि कार्यकर्त्यांच्या गणेश मंडळांना त्यांनी भेटी दिल्या नसल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT