पुणे: शहरातील गणेशोत्सव, महापुरुषांच्या जयंतींसह विविध सण-उत्सव उत्साहात साजरे झाले पाहिजेत. मात्र, उत्सवाच्या नावाखाली ध्वनिक्षेपकांचा अतिरेक किंवा नियमांचे उल्लंघन होता कामा नये. न्यायालयाने घालून दिलेले निर्बंध आणि पोलिस प्रशासनाने निश्चित केलेल्या नियमांच्या चौकटीतच साऊंड सिस्टिमचा वापर व्हावा.
पारंपरिक वाद्यांना अधिकाधिक प्राधान्य देऊन पुण्याची संस्कृती आणि उत्सवाची प्रतिष्ठा जपली पाहिजे, अशी भूमिका शिवसेना (एकनाथ शिंदे गट) शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी मांडली. न्यायालयाने ध्वनिप्रदूषणा संदर्भात वेळोवेळी नियम आणि निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर पोलिस प्रशासनाकडूनही मिरवणुकांमधील साऊंड सिस्टिमबाबत सूचना देण्यात येतात.
पोलिसांनी चार बेस आणि चार टॉपची मर्यादा निश्चित केली असेल, तर त्याच मर्यादेत ध्वनिक्षेपकांचा वापर झाला पाहिजे. आवाजाची निर्धारित मर्यादाही ओलांडली जाता कामा नये. नियम सर्वांसाठी समान असून, सण किंवा उत्सव कोणताही असला तरी त्याचे पालन झालेच पाहिजे. सण-उत्सव हे नागरिकांना आनंद देण्यासाठी आणि समाजाला एकत्र आणण्यासाठी असतात. त्यामुळे एका घटकाचा उत्साह दुसऱ्या नागरिकासाठी त्रासदायक ठरू नये.
ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, लहान मुले, रुग्ण तसेच मिरवणूक मार्गालगत राहणाऱ्या नागरिकांचाही विचार मंडळांनी करणे आवश्यक आहे. नियमांचे पालन करण्याची जबाबदारी केवळ पोलिस प्रशासनाची नसून संबंधित मंडळे, त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचीही आहे. प्रशासनाला कारवाई करण्याची वेळच येणार नाही, अशा पद्धतीने स्वयंशिस्त पाळणे अपेक्षित असल्याचेही भानगिरे यांनी नमूद केले.
‘पारंपरिक वाद्ये हीच आपली ओळख’
पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. आज पुण्याचा गणेशोत्सव देशासह जगभरात पोहोचला असून, त्याला वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे ध्वनिक्षेपकांचा अतिरेक, नियमभंग किंवा अन्य अनुचित प्रकारांमुळे या उत्सवाला गालबोट लागता कामा नये. कर्णकर्कश ध्वनिक्षेपकांच्या स्पर्धेपेक्षा ढोल-ताशा, लेझीम, झांज, मृदंग, टाळ आणि अन्य पारंपरिक वाद्यांना प्राधान्य दिले पाहिजे. आधुनिक साऊंड सिस्टिम वापरण्यास विरोध नसला, तरी तिचा वापर नियमांच्या चौकटीतच असला पाहिजे, असे ही भानगिरे नमूद केले.