पुणे

Pune Ganeshotsav 2023 : कालिया मर्दन अन् इंद्रमहाल

अमृता चौगुले

पुणे : यमुनेत पडलेली विटी काढताना श्रीकृष्णाचा कालिया नागाशी झालेला सामना… मूळ रूप धारण करत श्रीकृष्णाने कालिया नागाच्या डोक्यावर केलेले नृत्य… भगवान श्रीकृष्णाकडून कालियाला मिळालेले जीवदान अन् त्यानंतर कालियाच्या दहशतीपासून मुक्त झालेल्या गोकूळवासियांनी केलेल्या जल्लोषाचा रास्ता-नाना पेठेतील आझाद आळीतील आझाद तरुण मंडळाने केलेला हलता देखावा परिसरात आकर्षणाचा केंद्रबिदू ठरत आहे.

संयुक्त सोमवार व रास्ता पेठ येथील सूर्योदय मित्र मंडळ कब्बडी संघाने 'कुंभकर्ण वध' हा देखावा सादर केला आहे. देखाव्यातील पंधरा फुटी कुंभकर्ण हा बालचमूचा आकर्षणाचा विषय आहे. देखाव्यातील विविध पात्रांच्या आवाजाने गणेशभक्तांना रामायणातील कुंभकर्ण व त्याचा वध हा प्रसंग अंगावर शहारे आणणारा ठरतोय. श्रीयाळ शेठ चौकातील सुभाष तरुण मित्र मंडळाने चंद्र व चंद्रयानाची प्रतिकृती उभारत मंडळाचा देखावा सादर केला आहे.

रास्ता पेठेतील मराठा मित्र मंडळाने 'मै कैलास का रहने वाला, मेरा नाम है शंकर' हा शंकर महाराजांवर आधारित स्थिर देखावा सादर केला आहे. मंडळाने उभारलेल्या देखाव्याची कलाकुसर नजरेत भरण्यासारखी आहे. याखेरीज, येथील नायडू गणपती मंडळाची दगडावर शारदेसोबत बसलेली व बाजूला सिंह, मयूर असलेली गणेशमूर्ती मोहवून टाकणारी आहे. अखिल रास्ता पेठ व्यापारी संघटना व पदाधिकार्‍यांच्या जागृत गणपती मंडळ ट्रस्टची भव्य व बैठ्या आसनातील मूर्ती गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे.

अपोलो टॉकीज परिसरातील कै. रवींद्र नाईक चौक मित्र मंडळाने 50 फुटी इंद्रप्रस्थ महाल साकारला आहे. पांढर्‍याशुभ्र रंगाच्या महालात विराजमान झालेली गणरायाची मूर्ती मन मोहून टाकते. शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या रास्ता व नाना पेठेत यंदा बहुतांश मंडळाने साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याकडे भर दिला आहे. रास्ता पेठेतील संभाजी मित्र मंडळ (ट्रस्ट), अपोलो टॉकिज चौक मंडळ, श्री दत्त क्लब मंडळ ट्रस्ट, श्री मंगलमूर्ती मित्र मंडळ, राष्ट्रीय हिंद मंडळ, सत्यजोत तरुण मंडळ, विकास तरुण मित्र मंडळ, वीर तानाजी मंडळ ट्रस्ट सत्यवीर संघ, नाना पेठ गवळी मंडळ तर नाना पेठेतील राष्ट्रीय तरुण मंडळाने यंदा फुले, घंटा, तसेच विविधरंगी कापडांचा वापर करून साधी सजावट करत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT