सांगली दरोडा प्रकरण : दरोड्यासाठी ‘सुबोध’ने केला 25 लाखांचा खर्च! | पुढारी

सांगली दरोडा प्रकरण : दरोड्यासाठी ‘सुबोध’ने केला 25 लाखांचा खर्च!

सचिन लाड

सांगली ः येथील ‘रिलायन्स ज्वेल्स’ या पेढीवर दरोडा टाकण्यासाठी वाहने, पिस्तूल, प्रवास, लॉजवर मुक्काम यासाठी मुख्य सूत्रधार सुबोध सिंग याने 25 लाख रुपये खर्च केल्याचे निष्पन्न झाले आहे. बिहारमधील तुरुंगात सात महिन्यापूर्वीच दरोडा टाकण्याचा कट रचला. तेव्हापासून सुबोधने त्याच्या नऊ साथीदारांना महिन्याला एक लाख रुपये पगार सुरू केला होता, अशी माहितीही तपासातून पुढे आली आहे.

राजकीय आश्रयामुळे ‘बडदास्त’!

सात राज्यांत दरोड्याची मालिका रचून कोट्यधीश झालेल्या टोळीचा म्होरक्या सुबोध सध्या बिहारमधील पटना तुरुंगात आहे. राजकीय आश्रयामुळे तुरुंगात त्याची चांगलीच ‘बडदास्त’ ठेवली जात आहे. तुरुंगात बसूनच दरोड्याचे तो कट रचत आहे. प्रत्येक दरोड्यात नवीन साथीदार घ्यायचे, हा त्याचा फंडाच आहे. तुरुंगात बसून ‘व्हिडीओ कॉन्फरन्स’द्वारे तो मुलाखत घेऊन दरोड्यासाठी साथीदारांची निवड करतो.

ओडिशातील कट फसला!

टोळीने ओडिशात ‘रिलायन्स ज्वेल्स’वर दरोडा टाकण्याचा कट रचला. यासाठी सहा साथीदारांची जुळवा-जुळव केली. पण तिथे गर्दी खूप असल्याने तेथील दरोड्याचा कट फसला. त्यानंतर कोल्हापूर निवडण्यात आले. यासाठी नऊ जणांची निवड केली. संशयित नांदेडचा गणेशने कोल्हापुरात जाऊन ‘रेकी’ केली. मात्र रिलायन्स ज्वेल्स मॉलमध्ये होते. तिथे गर्दी खूप असल्याने पकडले जाऊ, या भीतीने टोळीने तेथील बेत रद्द केला.

सांगलीकडे निशाणा!

डिसेंबर 2022 मध्ये सांगलीत रिलायन्स ज्वेल्सवर दरोडा टाकण्यासाठी सुबोधने साथीदारांशी चर्चा केली. यासाठी नऊ जणांची टोळी तयार केली. गणेशने टोळीप्रमुख म्हणून भूमिका बजावली. सुबोधने डिसेंबरपासून नऊ जणांना प्रत्येकी एक-एक लाख रुपये पगार सुरू केला. दरोड्यासाठी जो काही खर्च येईल, तो सर्व सुबोधने घातला. बिहारसह वेगवेगळ्या राज्यातील साथीदार ठाण्यात एकत्र झाले. तिथे कार, तर कर्नाटकातील गुलबर्गा येथून दुचाकी खरेदी केली.

25 लाखांचा खर्च

बिहारमधून सांगलीपर्यंत येण्याचा तसेच परतीचा प्रवास, वाहने खरेदी, आधारकार्ड बनावट बनविणे, पिस्तूल, काडतुसांची खरेदी, लॉजवरील मुक्काम, जेवण यासाठी 25 लाखांचा खर्च करण्यात आला. नऊ जणांचा महिन्याला नऊ लाख रुपये पगार… दरोडा टाकेपर्यंत सात महिन्यांचा कालावधी गेला. यासाठी सुबोधने पगारापोटी 63 लाख रुपये खर्च केल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. दरोड्याचा खर्च आणि पगार असा जवळपास एक कोटीच्या आसपास त्याने खर्च केला आणि लुटले 15 कोटीचे दागिने.

गणेश सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये चित्रित

दरोडा यशस्वी झाल्यानंतर पळून जाण्यासाठी कारचा वापर केला. कार गणेश चालवित होता, असे रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यातील फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येते. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठीच त्यांनी कार भोसे (ता. मिरज) येथे सोडून पलायन केले. पुढील प्रवासात कुठे सापडू नये, यासाठी पिस्तूलही कारमध्येच ठेवली.

Back to top button