पोस्टाची तिकिटे जमवून मिळणार शिष्यवृत्ती

पोस्टाची तिकिटे जमवून मिळणार शिष्यवृत्ती

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  विविध छंद जोपासणार्‍या अन् पोस्टाची तिकिटे गोळा करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी भारतीय पोस्ट विभागाच्या वतीने दीनदयाल स्पर्श योजनेद्वारे शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. यासाठी पोस्ट विभागाने प्रचार-प्रसाराचे काम हाती घेतले असून ही योजना अखिल भारतीय स्तरावर सुरू करण्यात आली आहे.

याद्वारे एकूण 920 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. देशातील प्रत्येक सर्कलमधून जास्तीत जास्त 40 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. इयत्ता 6 वी ते 9 वी मधील विद्यार्थी या योजनेस पात्र ठरणार आहेत. या योजनेद्वारे महाराष्ट्रामधून जास्तीत जास्त 40 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. पात्रता अटींची पूर्तता करणार्‍या आणि अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 500 रुपये प्रतिमहिना याप्रमाणे वर्षाला 6000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाईल.

पात्रता अटी : विद्यार्थी मान्यताप्राप्त शाळेच्या फिलाटली क्लबचा सदस्य असणे आवश्यक आहे किंवा त्याचे फिलाटली डिपॉझिट खाते असणे आवश्यक आहे. अंतिम परीक्षेत किमान 60 टक्के गुण किंवा समतुल्य ग्रेड प्राप्त केलेला असावा. यात अनु. जाती आणि अनु. जमातीच्या विद्यार्थ्यांना 5 टक्के सूट आहे.

फिलाटली खाते : फिलाटली डिपॉझिट खाते हे 15 ते 20 विद्यार्थ्यांचे मिळून किंवा वैयक्तिक काढता येते. 200 रुपये भरून हे खाते उघडता येणार आहे.

निवड प्रक्रिया : शिष्यवृत्तीसाठी दोन स्तरावर निवड प्रक्रिया राबवली जातेे. यात फिलाटली लेखी परीक्षा व फिलाटली प्रोजेक्टचा समावेश आहे. लेखी परीक्षा झाली असून लेखी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट सादर करता येणार आहेत. प्रोजेक्टच्या मूल्यमापनानंतर विद्यार्थ्यांची अंतिम निवड होते.

शिष्यवृत्तीसाठी निकष

स्पर्धेत सहभागी होणार्‍या प्रत्येक शाळेला फिलाटली ग्रुप खाते पोस्टात काढावे लागणार आहे. ज्या शाळांनी यात सहभाग नोंदवला आहे त्यांना 15 ते 20 विद्यार्थ्यांचा फिलाटली ग्रुप बनवावा लागणार आहे. या विद्यार्थ्यांना प्रसिध्द फिलाटलीस्टद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. असा फिलाटली क्लब बनवला जाणार असून ते विद्यार्थ्यांना फिलाटलीसंबंधी प्रोजेक्टमध्ये मदत करणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news