Ganeshotsav Pudhari
पुणे

Pune Ganeshotsav: ‘मोरया मोरया’च्या जयघोषात पुण्यनगरी गणेशमय; मानाच्या पाचही गणरायांचे दिमाखात आगमन!

ढोल-ताशांचा कडकडाट, गुलालाची उधळण अन् भक्तांची अलोट गर्दी; घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांत विधिवत प्राणप्रतिष्ठेने गणेशोत्सवाला प्रारंभ

पुढारी वृत्तसेवा

पुणे: ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया...’चा जयघोष अन् ढोल-ताशांच्या कडकडाटात महाराष्ट्राचे आराध्य दैवत, १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेल्या लाडक्या विघ्नहर्त्या गणरायाचे सोमवारी (दि. १४) अत्यंत उत्साहात अन् मंगलमय वातावरणात आगमन झाले. घरोघरी आणि सार्वजनिक उत्सव मंडपांमध्ये बाप्पाची विधिवत प्राणप्रतिष्ठेने या चैतन्यमयी आनंदोत्सवाला सुरुवात झाली.

सकाळपासूनच मध्य पुण्यातील रस्ते, चौक आणि गल्ल्या बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या होत्या. मानाच्या गणपतींच्या दिमाखदार मिरवणुका सकाळच्या सत्रात निघाल्या आणि संपूर्ण शहरात गणेशोत्सवाचा अनोखा उत्साह संचारला. पारंपरिक पोशाखात सज्ज झालेले तरुण-तरुणी, ढोल-ताशा पथकांचा रोमहर्षक वादनाचा नाद आणि गुलालाची उधळण, यामुळे परिसर न्हाऊन निघाला होता. मिरवणुका पाहण्यासाठी आणि बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकरांनी ठिकठिकाणी मोठी गर्दी केली होती.

गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांनी मध्यवर्ती भागात काही ठिकाणी रस्ते बॅरिकेड लावून वाहतुकीसाठी बंद केले होते. सार्वजनिक मंडळांपाठोपाठ घरोघरीही बाप्पाचे थाटामाटात आगमन झाले. आबालवृद्धांच्या चेहऱ्यावर आपल्या लाडक्या देवतेला घरी नेण्याचा आनंद ओसंडून वाहत होता. संपूर्ण शहर आता बाप्पाच्या भक्तीत आणि उत्सवाच्या जल्लोषात तल्लीन झाले.

घराघरांत मांगल्याचे वातावरण, घरगुती गणपतींचे थाटात आगमन

सार्वजनिक गणेश मंडळांसोबतच शहरात घरोघरी घरगुती बाप्पांचे आगमन अत्यंत भक्तिभावाने झाले. नागरिकांनी कुटुंबीय, नातेवाईक आणि शेजाऱ्यांसह गणपतीच्या स्टॉलवरून बाप्पाच्या मूर्ती आनंदाने घरी आणल्या. कोणी पायी, कोणी दुचाकी तर कोणी चारचाकी वाहनातून बाप्पाला सन्मानाने घरी नेले. घराघरांत सुंदर मखर, रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली होती. दुपारी उशिरापर्यंत विधिपूर्वक पूजा-अर्चा करून आरती करण्यात आली. घरोघरी तयार केलेल्या मोदकांचा आणि नैवेद्याचा घमघमाट पसरला होता.

पुण्याचे दैवत! मानाचे अन् प्रसिद्ध बाप्पा उत्सव मंडपात स्थानापन्न

पुण्याच्या गणेशोत्सवाची शान असलेल्या मानाच्या पाचही गणपतींची सकाळच्या सत्रात अत्यंत शिस्तबद्ध आणि मंगलमय वातावरणात मिरवणूक काढून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मानाचा पहिला कसबा गणपती, दुसरा तांबडी जोगेश्वरी, तिसरा गुरुजी तालीम, चौथा तुळशीबाग, पाचवा केसरीवाडा गणपती बाप्पाची देखील पारंपरिक पद्धतीने प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. याशिवाय श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, अखिल मंडई मंडळ, नवसाचा बाबू गेणू मंडळ, जिलब्या मारुती, हत्ती गणपती आणि शारदा-गजानन मंडळ या सर्वच प्रमुख सार्वजनिक मंडळांनी भव्य मिरवणुका काढून बाप्पांची स्थापना केली. पुढील दहा दिवस आता अवघी पुण्यनगरी ‘मोरया मोरया’च्या जयघोषाने आणि विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांनी गजबजणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT