पुणे: गणेशोत्सवाच्या मुख्य मिरवणुकीसाठी आरोग्य कक्ष, हिरकणी कक्ष, स्वागत मंडप आणि बॅरिकेडिंगच्या कामांसाठी एकाच प्रभागात तब्बल चार स्वतंत्र निविदा काढण्याचा प्रकार अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर यांच्या आदेशाने थांबविण्यात आला आहे. एकाच स्वरूपाचे आणि एकाच ठिकाणचे काम चार तुकड्यांत विभागून काढलेल्या या निविदा रद्द करून संपूर्ण कामासाठी एकच निविदा काढण्याचे आदेश नायर यांनी विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाला दिले आहेत.
चार स्वतंत्र निविदा काढल्या होत्या
झोन क्रमांक ५ अंतर्गत विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाने गणेशोत्सवाच्या मुख्य मिरवणुकीदरम्यान आरोग्य कक्ष, हिरकणी कक्ष, स्वागत मंडप आणि बॅरिकेडिंग उभारण्यासाठी प्रत्येकी सुमारे २१ लाख १८ हजार रुपयांच्या चार स्वतंत्र निविदा काढल्या होत्या. या कामांसाठी महापौर निधीतून प्रभाग क्रमांक २५ मधील चारही नगरसेवकांना प्रत्येकी २५ लाख रुपयांचे 'लॉकिंग' करून देण्यात आले आहे.
मुख्य मिरवणूक मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या पश्चिमेकडील भाग प्रभाग क्रमांक २५ मध्ये येतो. त्यामुळे महापौर निधीतून उपलब्ध झालेल्या सुमारे एक कोटी रुपयांतून एकच निविदा काढणे शक्य असतानाही चार स्वतंत्र निविदा काढण्यात आल्याने प्रश्न उपस्थित झाले आहेत. २५ लाख रुपयांपर्यंतच्या निविदांना प्रभाग समितीला मंजुरीचे अधिकार असल्याने कामाचे चार भाग करण्यात आल्याने संशयाला आणखी बळ मिळाले. मिरवणूक मार्गावर महापालिकेची कार्यालये, दवाखाने तसेच जुन्या शिक्षण संस्थांच्या इमारती आहेत.
आरोग्य विभागाच्या १५ सुसज्ज रुग्णवाहिका आणि तीन आयसीयू बेडची सुविधाही उपलब्ध आहे. हिरकणी कक्षासाठी महापालिका कार्यालये, शाळा किंवा महाविद्यालयांच्या वर्गखोल्यांचा वापर करता येणे शक्य असल्याने या निविदांच्या आवश्यकतेवरही प्रश्न उपस्थित झाले होते. याबाबत नायर यांनी एकाच प्रभागात एकसारख्या कामासाठी चार निविदा काढणे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले. या चारही निविदा रद्द करून तातडीने एकच निविदा काढण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.
निधीच्या 'तुकड्यां'मागे नेमके काय?
झोन क्रमांक ५ मध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान यापूर्वी खासगी संस्थांच्या मदतीने स्वागत कक्ष आणि पोलिस कक्ष उभारण्यात येत होते. असे असतानाही याच कामांसाठी महापौर निधीतून चार नगरसेवकांना प्रत्येकी २५ लाख रुपये उपलब्ध करून देऊन चार स्वतंत्र निविदा काढण्याच्या उद्देशाबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.