FDA Action Pudhari
पुणे

Pune Food Safety: गणेशोत्सवात पुण्यात २८ हजार किलो भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ जप्त

पेढे, खवा, पनीर, बटर, तूप आणि मिठाईवर एफडीएची कारवाई; ११ सप्टेंबरपासून तपासणी मोहिमेला वेग

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे शहरासह जिल्ह्यात अन्न औषध विभागाकडून ऐन गणेशोत्सवाच्या काळात म्हणेज ११ सप्टेंबरपासून आजपर्यंत आठ ते दहा छोट्या-मोठ्या कारवाया करण्यात आल्या असून, यामध्ये सर्वाधिक २८ हजार किलो भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ (खवा, पेढे, पनीर, बटर, तूप) जप्त केले आहे. दरम्यान, एफडीएकडून अजूनही कारवायांचा धडाका सुरू असून, भेसळयुक्त अन्नपदार्थ बाजारात असल्याचे स्पष्ट होत असून, ग्राहकांच्या ताटापर्यंत पोहोचणाऱ्या अन्नाच्या सुरक्षिततेबाबत चिंता उपस्थित केली जात आहे.

सध्या गणेशोत्सव सुरू असून, या काळात पेढे, मिठाई, खवा, पनीर आणि तुपाला मोठी मागणी असते. त्यामुळे प्रशासनाच्या कारवायांमध्ये सातत्याने मोठ्या प्रमाणावर दुग्धजन्य पदार्थ सापडत असतील, तर बाजारात तपासणीच्या कक्षेबाहेर किती माल फिरत असावा, हा प्रश्न उपस्थित होत आहे. कारवाईत जप्त होणारा माल ग्राहकांकडून सहज खरेदी केला जात असल्याने 'ग्राहकांच्या ताटापर्यंत पोहोचण्याआधीच भेसळ रोखणार कधी?' हा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे.

विशेष म्हणजे ही कारवाई केवळ पुणे जिल्ह्यातील असून, विभागांतर्गत सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आकडेवारी आणि जप्त केलेल्या अन्नपदार्थांचे प्रमाण आणखी व्यापक आहे. त्यावरून सणावारांमध्ये पेढे, मिठाई कितपत योग्य आणि गुणवत्तापूर्ण आहे, यावरून स्पष्ट होत आहे.

तारीख - ठिकाण - जप्त केलेला माल

  • ११ सप्टेंबर - बुधवार पेठ - संशयित पनीर - १२,५०० किलो

  • ११ सप्टेंबर - बुधवार पेठ - संशयित खवा - ४,६०० किलो

  • ११ सप्टेंबर - पाटस, दौंड - बटर, दूध पावडर - १,५१९ किलो

  • १३ सप्टेंबर - मंचर - खवा - ४९ किलो

  • १३ सप्टेंबर - मंचर - पनीर - १०४ किलो

  • १३ सप्टेंबर - मंचर - तूप - ११ किलो

  • २० सप्टेंबर - बाणेर आणि इतर परिसर - मोदक, मिठाई - ३५०० किलो

  • इतर किरकोळ दूग्धजन्य पदार्थ - ६,५०० किलो

  • एकूण - २८ हजार किलो दुग्धजन्य पदार्थांवर कारवाई करण्यात आली आहे.

एफडीएकडून सातत्याने कारवाई सुरू आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले अन्न, पदार्थ मिळावे हाच एकमेव हेतू आहे. भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई होत असल्याने इतर भेसळखोरांचे धाबे दणाणले असून, भेसळीचे प्रमाण कमी होत चालले आहे. नागरिकांनी चांगल्या पदार्थांना प्राधान्य द्यावे.
दिगंबर भोगावडे, सहआयुक्त, अन्न औषध प्रशासन, पुणे विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT