

पुणे: गणेश विसर्जन मिरवणूक सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी पुणे पोलिस दल सज्ज झाले असून, शहरात तब्बल १० हजारांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर मध्यवर्ती भागातील मुख्य मिरवणूक मार्गांसह शहरात तब्बल दोन हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कडक नजर असणार आहे. तसेच ध्वनिप्रदूषण, गर्दी व्यवस्थापन आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. विसर्जन मिरवणुक किती वेळेत संपते हे धेय्य नसून विसर्जन मिरवणुकी निर्विघ्न कशी पार पडते हे आमचे लक्ष असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलीस प्रशासनाच्या तयारीचा सविस्तर आढावा मांडला. मिरवणूक सुरळीत पार पडावी आणि नागरिकांच्या सुरक्षेला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी विविध पातळ्यांवर नियोजन करण्यात आले आहे. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सहपोलिस आयुक्त संजय दराडे, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, संजय पाटील, राजेश बनसोडे, तेजस्वी सातपुते आदी उपस्थित होते.
असा असेल १० हजारांचा बंदोबस्त
विसर्जन मिरवणुकीसाठी शहरात सुमारे १० हजारांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षा यंत्रणेचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये ४ अपर पोलिस आयुक्त, १४ पोलिस उपायुक्त, ३५ सहायक पोलिस आयुक्त, १५४ पोलिस निरीक्षक, ६७५ पोलिस उपनिरीक्षक आणि सुमारे सात हजार पोलिस अंमलदारांचा समावेश आहे. तर एसआरपीएफच्या दोन कंपन्यांमधील सुमारे २०० कर्मचारी, ९०० होमगार्ड, १२ क्यूआरटी पथके आणि २१ राईट कंट्रोल पोलिस पथके, बॉम्ब स्कॉड पथके तैनात करण्यात आली आहेत. मिरवणुकीदरम्यान स्वयंसेवकांचीही मदत घेतली जाणार आहे.
सीसीटीव्ही आणि वॉचटॉवरची नजर
अलका टॉकीज चौक, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, लक्ष्मी रस्ता आणि केळकर रस्ता या महत्त्वाच्या परिसरांवर पोलिसांचे विशेष लक्ष असेल. या सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारण्यात आले असून, नियंत्रण कक्षातून निरीक्षण करण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. सुमारे दोन हजार कॅमेऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक घडामोडीवर सूक्ष्म लक्ष ठेवले जाणार आहे. आवश्यक ठिकाणी वॉचटॉवर उभारून त्यातूनही मिरवणुकीवर नजर ठेवली जाणार आहे. तर शहरातील मुख्य चौकात एआयवर आधारीत फेस रेकग्नायझेशनचे 100 कॅमेरे कार्यान्वीत करण्यात आले आहेत. तर शिवाजीनगर मुख्यालातून शहरातील सुरक्षेव्यवस्थेवर ऑनलाईन लक्ष ठेवण्यात आले आहे. मिरवणुकीवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येणार आहे.
ध्वनिप्रदूषणावर थेट गुन्हे
मिरवणुकीत ठरवून दिलेल्या वेळेचे आणि ध्वनीमर्यादेचे पालन सर्व मंडळांनी करणे बंधनकारक आहे. सवोच्च न्यायालयाचे निर्देशानुसार नियमबाह्य ढोल-ताशा पथके, लेझर लाईट्स आणि हाय-डेसिबल डीजे सिस्टीमवर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करून धडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.
गर्दी व्यवस्थापन; रुग्णवाहिकांसाठीही नियोजन
गणेशभक्तांची मोठी गर्दी लक्षात घेता लक्ष्मी रस्ता व इतर मुख्य मार्गांवर वाहतूक आणि गर्दीचे नियोजन करण्यात आले आहे. मिरवणुकीदरम्यान वाहतुकीची हालचाल सुरळीत राहण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका तसेच अग्निशामक दलाच्या गाड्यांना विनाअडथळा मार्ग मिळावा, यासाठीही नियोजन तयार करण्यात आले.
गुन्हेगारांवर करडी नजर
रेकॉर्डवरील गुन्हेगार, तडीपार व्यक्ती आणि मिरवणुकीत अनुचित प्रकार घडविणाऱ्या असामाजिक तत्त्वांवर पोलिसांचे बारीक लक्ष असेल. अशा व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबरोबरच मिरवणुकीदरम्यान त्यांच्या हालचालींवरही नजर ठेवली जाणार आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी साध्या वेषातील पोलिस कर्मचारी आणि विशेष महिला पथके तैनात असणार आहेत. मोबाईल चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी साध्या वेशात पोलिस गस्त घालणार आहेत. तसेच महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. गणेशोत्सव आणि विसर्जन सोहळा शांततेत, उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व नागरिक, गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.