पुणे: निवडक काही तालुके वगळता जवळपास सर्व राज्यच दुष्काळाच्या उंबरठ्यावर असल्याने समाजासाठी नेहमीच कळकळीने धावून जाणाऱ्या गणेशोत्सव मंडळांनी आपल्या मांडवात 'एक नोट शेतकऱ्यांसाठी' असे आवाहन करणाऱ्या पेट्या ठेवून किमान शंभर शेतकऱ्यांचा वर्षाचा खर्च उचलण्याचा निश्चय केल्यास पुण्याच्या गणेशोत्सवाची सामाजिक कामांची परंपरा आणखी उज्ज्वल होईल. त्यामुळे अधिकाधिक मंडळांनी यात पुढाकार घ्यावा आणि जाणत्या कार्यकर्त्यांनी या उपक्रमाचे नियोजन करावे, असे आवाहन 'पुढारी गणेशोत्सव व्यासपीठा'च्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आहे.
अल निनोचा फटका राज्यातील खरीप हंगामाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांचा त्यात समावेश आहे. अशा वेळी उत्सव साजरा करीत असतानाच या दुष्काळी परिस्थितीचेही भान पुण्यातील गणेशोत्सव मंडळांचे विवेकी कार्यकर्ते ठेवतील, असा विश्वास असल्याने शेतकऱ्यांना मदत देण्याचा उपक्रम राबवावा, अशी सूचना गणेशोत्सव व्यासपीठातील गणेश मंडळांच्या काही कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.
पुण्यातील गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मांडवात एक मदत पेटी ठेवावी, तिच्यावर 'एक नोट शेतकऱ्यांसाठी' असे शीर्षक असलेला फ्लेक्स लावून उत्सव पाहण्यासाठी येणाऱ्यांना मदतीचे आवाहन करावे, अशी सूचना कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. पुण्यातल्या मंडळांमध्ये अशा प्रकारे जमलेल्या निधीतून शेतकऱ्यांना मदत केली जाईल. किमान शंभर शेतकऱ्यांचा वर्षाचा खर्च उभा करण्याचे उद्दिष्ट ठरवल्यास ते अधिक चांगले होईल.
त्यात त्यांचा उदरनिर्वाहाचा खर्च तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च यांचा समावेश करता येईल. याबाबत जय गणेश व्यासपीठाचे प्रमुख पदाधिकारी आणि साईनाथ मंडळाचे अध्यक्ष पीयूष शहा म्हणाले, की शेतकऱ्यांना मदत ही कल्पना उत्तम असून, जय गणेश व्यासपीठ यामध्ये निश्चितच पुढाकार घेईल. अन्नदाता हा कणा आहे आणि तो जगला पाहिजे. तो संकटात असताना आम्ही मंडळे नक्की साथ देऊ. आदर्श मित्र मंडळाचे उदय जगताप यांनीही याला दुजोरा दिला.
किमान काही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवूया
यवतमाळसारख्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत ओढग्रस्तीची असल्याने तेथे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. त्यात दुष्काळामुळे आत्महत्येच्या प्रमाणात वाढ होण्याची भीती आहे. पुण्यातील मंडळांनी किमान शंभर शेतकऱ्यांच्या पाठीवर हात ठेवला, तर त्यातील काही आत्महत्या रोखता येतील. उत्सव साजरा करताना या शेतकऱ्यांचेही भान पुण्यातील कार्यकर्ते निश्चितच ठेवतील. कोरोनाच्या साथीमध्ये पुण्यातील याच मंडळांनी रुग्णसेवेपासून अन्नपुरवठ्यापर्यंतच्या सेवा दिल्या होत्या. कोरोनानंतर पुन्हा अशाच प्रकारे मोठा उपक्रम या मंडळांना हाती घेता येणार असल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.