DJ Free Ganeshotsav Pudhari
पुणे

Pune Ganeshotsav DJ Noise: डीजेचा दणदणाट नको; पुणेकरांचा ‘मध्यम मार्गा’चा सूर! ध्वनिमर्यादेची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी

‘सणाच्या आनंदासाठी दुसऱ्यांना त्रास नको’; डीजे बंदीपासून मर्यादित आवाजापर्यंत पुणेकरांची संमिश्र मते

पुढारी वृत्तसेवा

पुणे: गणेशोत्सवातील डीजेच्या कर्णकर्कश आवाजावरून पुणेकरांमध्ये मतमतांतरे असली, तरी स्वतःच्या आनंदासाठी दुसऱ्यांना त्रास देणे उचित नाही, याबाबत पुणेकरांचे एकमत आहे. उत्सवात थेट डीजे बंदी घालणे, हा पर्याय असू शकत नसला; तरी मध्यम मार्ग महत्त्वाचा आहे.

ध्वनिप्रदूषणामुळे ज्येष्ठ, विद्यार्थी आणि कुटुंबीयांना होणारा त्रास देखील तितकाच महत्त्वाचा असून, समाजातील तसेच आरोग्याबाबत होणारे विपरीत परिणामही तितकेच जबाबदार असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे बंदीपेक्षा ध्वनिमर्यादेची काटेकोर अंमलबजावणी, स्पीकरची रचना व जागेत बदल आणि नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई, असा मध्यम मार्ग काढण्याची अपेक्षा सुजाण पुणेकरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

डीजेमधील डिस्क जॉकी हा स्पीकर भिंतीच्या मागे असतो. त्याची जागा बदलून स्पीकरची भिंत पुढे केल्या तर मोठा येणारा आवाज आपसूकच कमी होईल. थेट बंदी घालणे हा पर्याय योग्य वाटत नाही. सण हा आनंद आणि समाधानासाठी साजरा केला जातो. केवळ मर्यादा आणि नियमावलींचे पालन केल्यास इतरांना त्रास होणार नाही. मध्यम मार्ग काढणे अपेक्षित आहे.
मिलिंद कुलकर्णी, पुणे
डीजेशिवाय पुण्याचा गणेशोत्सव होणे शक्य नाही. डीजे बंद करणे हे अत्यंत चुकीचे आहे. डीजे, डॉल्बीशिवाय पुण्याच्या गणेशोत्सवाची शान कमी होईल. डीजेच्या आवाजात थिरकण्यासाठी लांबलाबून परगावावरून लोक या मिरवणुकीत सहभागी होत असतात. केवळ आवाजावर मर्यादा आणून सण साजरे केल्यास समतोल साधला जाईल.
नितीन सांगळे, वारजे
दरवर्षी हा आवाज वाढतच चालला आहे. मिरवणुकीच्या दिवशी पुण्याबाहेर निघून जाणे हा पर्याय नाही. कारण आमच्या घरातील गणपतीचे विसर्जन त्याच दिवशी असते. आम्ही विसर्जनासाठी जात असताना ज्या मंडळांच्या मिरवणुका जात असतात, त्यामध्ये प्रचंड मोठ्या स्पीकरच्या भिंती लावून समोर दारू पिऊन लोक चित्रविचित्र नाचत असतात. जे बघणं देखील अवघड असते. प्रशासनाने या गैरप्रकारांवर निर्बंध घालण्यासाठी नियमांची काटेकोर अंमलबजावणी केल्यास आनंदात सण साजरा होईल.
सुभाष मोरे, कसबा पेठ
सण-उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे केल्यावर मनापासून आनंद मिळतो. दुसऱ्याला त्रास होईल, परिणाम करेल असा धांगडधिंगा करून उत्सव साजरा करणाऱ्याला परंपरा म्हणत नाही. येणाऱ्या गणेशोत्सवापासूनच डीजेवर बंदी घालून पुढचे सर्व धर्मांचे सण, उत्सव आणि सोहळ्यातून डीजे कायमचे बंद करावे. ढोल-ताशांच्या गजरात गणरायाची मिरवणूक मार्गस्थ करून सांस्कृतिक ठेवा जपणे सदृढ समाजाच्या दिशेने उचित ठरेल.
सदाशिव पाटील, भेकराईनगर, फुरसुंगी, पुणे
गणेशोत्सवाचे दहा दिवस आणि मुख्यत्वे शेवटच्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी आम्ही राहत असलेल्या संपूर्ण भागात इतकी प्रचंड गर्दी असते, की आम्हाला घराबाहेर पडणं देखील अवघड होते. त्यातच स्पीकरच्या आवाजामुळे खिडकीच्या काचा हादरतात, हृदयाचे ठोके वाढतात आणि आम्हाला घरातल्या घरात एकमेकांशी बोलणं देखील शक्य होत नाही. इतरांना त्रास देऊन सण-उत्सव साजरा करणे उचित नाही. डीजेही संकल्पनाच बंद करावी.
गोकूळ शिंदे, शुक्रवार पेठ
गेल्या अनेक वर्षांपासून आमचे कुटुंब पेठेत राहते. प्रत्येक धर्म आणि समाजाच्या कार्यक्रमांना, या ना त्या कारणाने कर्णकर्कश आवाजात स्पीकर सुरू असतात. रात्री उशिरापर्यंत आवाजाचा दणदणाट सुरू असतो. त्यामुळे घरातील शालेय मुलांना अभ्यासात अडथळे येतात, ज्येष्ठ व्यक्तींना त्रास होतो. कोणताही सार्वजनिक उत्सव, कार्यक्रम असला, की डीजे आहेतच. या समीकरणामुळे सण, उत्सव साजरा करण्याऐवजी तेढ, मतभेद, वादविवाद अशा विचित्र घटनांना खतपाणी मिळत आहे. आनंद साजरा करणाऱ्यांना बंधन नाही, पण दुसऱ्यांना त्रास देऊन आनंद साजरा करणे ही आपली संस्कृती नाही.
श्रीकांत दुभाषी, सदाशिव पेठ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT