पुणे: गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि श्रद्धेचा उत्सव आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजापेक्षा ढोल-ताशा, लेझीम, झांज, टाळ-मृदंग अशा पारंपरिक वाद्यांनाच प्राधान्य मिळाले पाहिजे. उत्सव जरूर जल्लोषात साजरा व्हावा; मात्र, त्याचे रूपांतर उन्मादात होता कामा नये. नागरिकांच्या आरोग्याला त्रास देणाऱ्या अतितीव्र आवाजाला आमचा विरोध आहे, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी पक्षाच्या वतीने मांडली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डीजे आणि डॉल्बी संस्कृतीबाबत यापूर्वीच पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. गणपती बाप्पाला श्रद्धेने आणल्यानंतर विसर्जनाच्या वेळी कर्णकर्कश डीजे लावून बेभान होणे महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाच्या परंपरेला साजेसे नाही. महाराष्ट्राला स्वतःची समृद्ध संस्कृती आणि उत्सवांची परंपरा आहे. त्यामुळे अन्य ठिकाणच्या उत्सवपद्धतींचे अंधानुकरण करण्याऐवजी आपल्या परंपरांचे जतन झाले पाहिजे, ही मनसेची भूमिका असल्याचे बाबर यांनी स्पष्ट केले.
उत्सवातून संस्कृती जोपासावी
लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सामाजिक एकोपा, प्रबोधन आणि लोकजागृतीचे अधिष्ठान दिले. आज मात्र शहरात उत्सवाची ओळख प्रचंड आवाज, डीजेच्या भिंती आणि बेभान नृत्य अशी होत असल्याचे चित्र आहे. गणेशोत्सवातून महाराष्ट्राची संस्कृती आणि सामाजिक भान पुढील पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे.
अतितीव्र आवाजाचा लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि हृदयविकार असलेल्या व्यक्तींना त्रास होतो. आपल्या आनंदामुळे सर्वसामान्य पुणेकरांना त्रास होणार नाही, याची जबाबदारी प्रत्येक मंडळाने घेतली पाहिजे. डीजेच्या दणदणाटापेक्षा पारंपरिक वाद्यांचा निनाद हीच महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची खरी ओळख आहे. त्यामुळे सण महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार, शिस्तीत आणि पारंपरिक पद्धतीने साजरा व्हावा, ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ठाम भूमिका आहे, असे बाबर यांनी नमूद केले.