Ganeshotsav Decoration Pudhari
पुणे

Pune Ganeshotsav Decoration: गणरायाच्या सजावटीला झगमगाटाची किनार; पुणेकरांकडून भारतीय बनावटीच्या विद्युत माळांना पसंती

स्टार, कमळ, मोर, समईपासून एलईडी पडद्यांपर्यंत विविध डिझाइनची रेलचेल; घरांसह सोसायट्या आणि मंडळांकडूनही खरेदीला जोर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच घराघरांत सजावटीची लगबग सुरू झाली आहे. आकर्षक मखर, फुलांची आरास, तोरणे यांसोबतच सजावटीला झगमगाटाची किनार देणाऱ्या विद्युत रोषणाईच्या माळांची खरेदीलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. बाजारपेठांमध्ये विविध रंग, आकार आणि डिझाइनच्या विद्युत रोषणाईच्या माळांची आणि दिव्यांची रेलचेल पाहायला मिळत असून, यंदा भारतीय बनावटीच्या माळांना पुणेकरांकडून विशेष पसंती मिळत आहे. त्यासोबतच चिनी माळांचीही खरेदीही होत आहे.

बाजारात स्टार, फुले, पाने, डायमंड, समई, पणत्या, ओम, मोर, कमळ अशा विविध डिझाईनच्या माळा उपलब्ध आहेत. रंगबिरंगी दिव्यांसह पांढऱ्या, पिवळ्या आणि बहुरंगी एलईडी माळांनाही पसंती मिळत आहे. गणेशोत्सव सजावटीतील महत्त्वाचा भाग म्हणजे विद्युत रोषणाईच्या माळा अन्‌ दिवे.... झगमगणाऱ्या विद्युत रोषणाईच्या माळांमुळे सजावटीला वेगळेच रुप प्राप्त होते. त्यामुळे घरातील बाप्पाच्या मखरापासून सोसायटीतील मंडपापर्यंत थीमनुसार विद्युत रोषणाई केली जाते.

बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह

यंदाही बाजारपेठेत लक्षवेधी, आकर्षक विद्युत रोषणाईच्या माळांमध्ये नानाविध प्रकार उपलब्ध आहेत. यंदा तोरण माळा हा प्रकारही लक्ष वेधून घेत आहे. प्रवेशद्वारावर आणि सजावटीत लावता येणाऱ्या या माळांमुळे सजावट अधिक आकर्षक दिसते. कमी जागेतही सुंदर रोषणाई करता येत असल्याने या प्रकाराला मागणी आहे., एलईडी लाईट्सचे पडदे हे यंदाच्या खरेदीतील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत आणि ते विविध रंगांमध्ये उपलब्ध आहेत.

घरातील सजावटीसोबतच सोसायट्या आणि सार्वजनिक मंडळांकडूनही मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाईच्या माळांची खरेदी केली जात आहे. पारंपरिक समई आणि पणतीच्या आकारातील एलईडी दिव्यांपासून ते कर्टन लाइट्सपर्यंत असे विविध पर्याय बाजारात उपलब्ध झाले आहेत. काहीजण मखराच्या रंगसंगतीशी जुळणाऱ्या माळांची खरेदी करत आहेत, तर काहीजण संपूर्ण सजावटीची थीम ठरवून त्यानुसार रोषणाई खरेदी करीत आहेत.

बाजारपेठांमध्येही खरेदीचा उत्साह पाहायला मिळत आहे. व्यावसायिक हितेश प्रजापती म्हणाले, ‘यंदा भारतीय बनावटीच्या माळा आणि चायनीज माळांचीही खरेदी होत आहे. यंदा पारंपरिक माळांसोबत विविध आकारांच्या माळा, तोरण माळा, एलईडी पडदे आणि डिझायनर दिव्यांचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. केवळ विद्युत रोषणाईच्या माळा खरेदी करण्यापेक्षा आपल्या मखराची किंवा गणेशोत्सव सजावटीची थीम लक्षात घेऊन विदयुत रोषणाईच्या माळांची आणि दिव्यांची निवड करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT